हापूस खरेदीसाठी अ‍ॅमेझॉन थेट पॅकहाऊसमध्ये

1 हजार डझन आंबा खरेदी; डझनला 800 रुपये दर

रत्नागिरी:- ऑनलाईन मार्केटींग करणार्‍या कंपन्या हापूस खरेदीसाठी थेट बागायतदारांच्या शिवारात दाखल झाल्या आहेत. यंदापासून जागेवर खरेदीसाठी प्रथमच रत्नागिरीत आलेल्या अ‍ॅमेझॉन कंपनीकडून 1 हजार डझन आंबा वीस शेतकर्‍यांकडून खरेदी केला असून 185 ते 220 ग्रॅमच्या फळाला 800 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. परिणामी विक्रेत्यांकडून सरासरी दरात समाधान मानणार्‍या शेतकर्‍याला आता स्वतः दर ठरवण्याची संधी मिळणार आहे.

कोकणातील हापूसची चव चाखण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातून मोठी मागणी आहे. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे बाजारातील आवक घटली आहे. रत्नागिरी, देवगडचा हापूसमध्ये भेसळ करुन विक्री होत असल्याने अनेकांना खर्‍या हापूसची चवच कळत नाही. त्यासाठी भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यानंतर पणन, कृषी विभागाकडून पावले उचण्यात आली आहे. त्याला ऑनलाईन कंपन्यांचीही जोड मिळू शकते. चार वर्षांपुर्वी बिगबास्केट या कंपनीने रत्नागिरीत थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला सुरवात केली होती. त्याचा फायदा बागायतदारांना झाला. त्यानंतर किशान कनेक्ट, टाटा फश सारख्या कंपन्याही उतरल्या आहेत. त्यात अ‍ॅमेझॉन कंपनीची भर पडली आहे. काही बागायतदार स्वतः ऑनलाईन विक्री करत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रत्नागिरीतील मिरजोळे येथे अ‍ॅमेझॉन मार्फत संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 1 हजार डझन हापूस शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात आला आहे.  खरेदीनंतर चार तासात पैसे बागायतदाराच्या बँक खात्यात जमा केले जातात. वाहतूकीचा खर्च टाळण्यासाठी अ‍ॅमेझॉन कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष बागायतदाराच्या पॅकहाऊसमध्ये जाऊन पॅकिंग करत आहेत. त्यामुळे बागायतदाराचा वाहतूक खर्च कमी झाला आहे. सध्या 185 ते 220 ग्रॅमपर्यंतचे पिकलेले फळ खरेदी केले जात आहे. रत्नागिरीतील शेतकर्‍यांना याचा फायदा मिळत असून जागेवर दर्जेदार आंबा खरेदी होत असल्यामुळे समाधान व्यक्त केला जात आहे. मुंबईतील वाशी बाजारात मोठ्याप्रमाणात हापूस विकला जातो. तेथील दलाल सरसकट माल खरेदी करताना सरासरी दर देतात. विशिष्ट ग्रेडचा आंबा विकला तर चांगला दर मिळू शकते हे ऑनलाईन कपंन्यांमुळे बागायतदारांच्या लक्षात आले आहे. उर्वरित आंबा स्थानिक ग्राहकाला कमी दरात विकला तर त्यामधूनही चांगले पैसे मिळू शकतात. तसेच शेतकरी स्वतः मालाचा दर ठरवू शकत आहे.