वाढता ‘ताप’ सागरी कासवांच्या जन्मावर

संशोधनातून निष्कर्ष; संवर्धनासाठी उपाययोजनाच्या सुचना

रत्नागिरी:-कोकणातील सागरी कासवांच्या विणीच्या हंगामातील बदल तापमान वाढीमुळे झाला. हीच वाढ कासवांच्या पिल्लांच्या जन्मावर प्रभाव पाडत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. तर उष्म्यामुळे वाळूखालील अंध लाल मुंग्या कासवांच्या पिल्लांसाठी घातक ठरत आहेत. कासव संवर्धनाच्या उपाययोजनांसाठी कांदळवन कक्षाला भुमिका घ्यावी लागणार आहे.

कोकण किनारपट्टीवर दरवर्षी ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालतात. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान वीण होते. पूर्वी नोव्हेंबर ते डिसेंबर या थंडीच्या महिन्यात सागरी कासवांची घरटी सापडत होती. गेल्या काही वर्षांमध्ये ही घरटी उन्हाळी महिन्यांमध्ये दिसू लागली आहेत. या बदलांबरोबरच कासवांच्या विणीवर तापमानाचा होणारा परिणाम तपासण्यासाठी एक अभ्यास प्रकल्प वन विभागाच्या ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’च्या माध्यमातून हाती घेण्यात आला. भारतीय वन्यजीव संस्थानचे वरिष्ठ संशोधक डॉ. के. शिवाकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ’पीएचडी स्कॉलर’ सुमेधा कोरगावकर यांनी अभ्यास केला. तिन वर्षे केलेल्या अहवालातून कासवांचा विणीवर तापमान बदलाचा गंभीर परिणाम होत असल्याचे पुढे आले आहे.

सागरी कासवांच्या पिल्लांचे लिंग विकसित होण्यासाठी घरट्यातील तापमान महत्त्वाची भूमिका बजावते. साधारण घरट्यामधील 29.5 अंश सेल्सिअस तापमानामुळे अंड्यांमध्ये समानरित्या नर आणि मादीचे लिंग विकसित होते. शिवाय 33 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान अंड्यांच्या विकासाकरिता सुरक्षित असते. मात्र, तापमान वाढीमुळे कोकणातील सागरी कासव विणीच्या प्रमुख हंगामात बदल झाला आहे. पूर्वी नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात होणारी कासवाची सर्वाधिक घरटी, आता फेब्रुवारी ते मार्च या उन्हाळी महिन्यांमध्ये होत असल्याचा निष्कर्ष अभ्यासातून पुढे आला आहे. ’डेटा लॉगर’च्या मदतीने केलेल्या तपासणीअंती घरट्यातील तापमान हे 36 ते 37 अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असल्याची नोंद झाली. कोकणातील कासव विणीचे बहुतांश किनारे हे नदीमुखाशी आहेत. परिणामी पाण्याबरोबर वाहून येणार्‍या गाळाचे कण वाळूमध्ये मिश्रित होतात. अशा परिस्थितीत घरट्यामधील आद्रर्ता आणि तापमान वाढल्यास गाळमिश्रित वाळू दगडासारखी कडक होते आणि त्यामध्ये पिल्ले अडकून मृत पावतात.