कॅच दी रेन अभियान प्रभाविपणे राबवावे

जिल्हाधिकारी डॉ. पाटील; जलशक्ती अभियान २०२२

रत्नागिरी:-जिल्ह्यामध्ये जलशक्ती अभियान २०२२ कार्यक्रमातंर्गत कॅच दी रेन अभियान प्रभाविपणे राबवण्यासाठी काल जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

जलस्त्रोतांचे संरक्षण व नूतनीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, वृक्षलागवड, भूजल साठ्यामध्ये वाढ करणे आदी कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, उपजिल्हाधिकारी रोहयो अमिता तळेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता दयानंद परवडी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी द. यो. दामा आदी उपस्थित होते. या अभियानातंर्गत जलस्त्रोतांचे संरक्षण व नूतनीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, वृक्षलागवड, भूजलसाठ्यामध्ये वाढ करणे इत्यादी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती जलशक्ती अभियानाच्या पोर्टलवर संबंधित विभागांनी वेळोवळी अद्ययावत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी बैठकीमध्ये दिल्या. तसेच नेहरु युवाकेंद्र, एनएसएस, शाळा व महाविद्यालये, अंगणवाड्या, ग्रामसभा, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या अभियानाची जनजागृती करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले. जिल्हा जलसंधारण अधिकारी द. यो. दामा यांनी पोर्टलबाबतची माहिती दिली.