पर्ससीनधारक मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर अतिविराट मोर्चा

रत्नागिरी:- नवीन मासेमारी कायद्यातील जाचक अटींमुळे पर्ससीन मासेमारी धोक्यात आली आहे. शासनाने या अटी रद्द कराव्यात आणि केवळ पर्ससीन मच्छिमारांना लक्ष करून कारवाई करू नये इतर मासेमारीचाही अभ्यास करावा या मागणीसाठी गुरुवारी मिरकरवाडा जेटी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला.


समुद्रातील मत्स्य साठ्यावर होणार्‍या प्रतिकूल परिणामाला प्रत्येकवेळी पर्ससीन नेट मासेमारीलाच जबाबदार धरून या मासेमारीवर जाचक निर्बंध टाकण्यात आले. इतर मासेमारी जाळ्यांनी होणार्‍या मासेमारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मत्स्यसाठा जतन करण्याबाबत नव्याने होणार्‍या अभ्यासात ट्रॉलनेट, डोलनेट, गिलनेट, हूक अ‍ॅन्ड लॅन्ड या मासेमारीचाही अभ्यास झाला पाहिजे, या मागणीसाठी पर्ससीन नेट मच्छिमार, मालक आणि या मासेमारीवर अवलंबून असणारे पुरक व्यावसायिक या विराट मोर्चात सहभागी झाले होते.

मिरकरवाडा जेटी येथून सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघाला. मोर्चामध्ये हजारो मच्छीमार बांधव सहभागी झाले होते. मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यलय असा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सभा घेऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी लतीफ महालदार, हनीफ महालदार, मेहबुब फडनाईक, सुहेल साखरकर, जावेद होडेकर, नासीर वाघू आदी नेते उपस्थित होते.