आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान नाणारमध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ- विरोधात जोरदार बॅनरबाजी

रत्नागिरी:- रिफायनरी राजापूर तालुक्यात अन्य ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरु असताना आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये ठिकठिकाणी रिफायनरी प्रकल्पाविरोधात आणि समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली. राजापूरपासून नाणारपर्यंत दोन्ही बाजूच्या गटांनी आपापले बॅनर झळकावल्याने एकच चर्चा सुरू होती. 


नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध होत असल्याने हा प्रकल्प लादणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. यामुळे हा रिफायनरी प्रकल्प कोकणताच दुसरीकडे उभारला जाण्याची दाट शक्यता आहे. चांगला प्रकल्प येत असेल तर नागरिकांना विश्वासात आम्ही घेऊन पुढे जाऊ आणि योग्य तो निर्णय घेऊ, असे रिफायनरी प्रकल्पाबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

या प्रकल्पाबाबत स्थानिकांशी चर्चा करणार आहे. तसेच, त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांना कळवणार आहे असही आदित्य म्हणाले आहेत. रिफायनरीमुळे पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचणार नाही याची काळजी घेऊ असही ते म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा सूर हा रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक असल्याचे दिसून येते आहे.

लोकांचा भरोसा जिंकून पुढे जाऊ, लोकांच्या मनात जे आहे ते डावलून पुढे जाणार नाही असेही आदित्य म्हणाले आहेत. कोणताही मोठा प्रकल्प येत असताना स्थानिक लोकांशी चर्चा होणे महत्त्वाचे असते. त्यांना समजवून सांगणे गरजेचे असते की नेमके काय आहे. त्यांचा होकार असेल तर पुढे जाऊ असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

 आदित्य यांना राजापूर रेस्टहाऊस येथे त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने रिफायनरी समर्थक थांबले होते. या समर्थकांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांना प्रतिकात्मक गुढी देऊन सांगण्यात आले की प्रकल्पाची गुढी लवकर उभारा, यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या. महिलांनी देखील रिफायनरी राजापूरमध्येच करा असे साकडे आदित्य ठाकरे यांना घातले.