सॅटलाइट टॅगिंग केलेले पहिले कासव निघाले पाकिस्तानकडे 

रत्नागिरी:- समुद्री कासवांचा अभ्यास करण्यासाठी रत्नागिरी येथे सॅटलाइट टॅगिंग करण्यात आलेल्या कासवांपैकी ‘प्रथमा’ कासवाने वेळासपासून तब्बल २५० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. हे कासव सध्या मुंबई मुक्कामी आहे. येथून ते गुजरातकडे आणि पुढे पाकिस्तान किंवा ओमानच्या दिशेने जाईल, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. कासवांच्या संवर्धनासाठी वन विभागासह कासवमित्रही सरसावले आहेत. ही कासवं एका किनार्‍यावर अंडी घालून गेली की त्यांचा पुढील प्रवास कसा होतो यावर अजुनपर्यंत अभ्यास झालेला नव्हता. यासाठी वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत पाच कासवांना  सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले आहे. कोकणातील किनार्‍यांवर अंडी घातल्यानंतर त्या कासवांचा पुढील प्रवास सुरू झाला आहे. टॅगिंगद्वारे कासव कुठे आणि कसा प्रवास करतात, याची माहिती गोळा केली जात आहे. वेळास येथून सोडण्यात आले पहिले ‘प्रथमा’ हे कासव डहाणुच्या पुढे मुक्कामी आहे. तेथून ते गुजरातच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर अभ्यासकांचे विशेष लक्ष असून त्यांच्या प्रवासाच्या नोंदीही ठेवण्यात येत असल्याचे कांदळवन कक्षाचे प्रधान सचिव विरेंद्र तिवारी यांनी सांगितले.