पंतप्रधान किसान सन्मानचा लाभ घेताना वेबसाईटच ठरतेय अडचण

रत्नागिरी:-पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील शेतकर्‍यांना ३१ मार्चपर्यंत ई- केवायसी करून घेण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, दुर्गम ग्रामीण भागात राहणार्‍या शेतकर्‍यांना गावात अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यातच शहरातही वेबसाइटवर येत असलेल्या समस्यांमुळे शेतकर्‍यांची चिंता अधिक वाढली आहे.

शेतकर्‍यांसाठी वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपयांची दिले जातात. जिल्ह्यात या योजनेचे २ लाख ६९ हजार ०८३ लाभार्थी आहेत. आतापर्यंत या योजनेचे पैसे दहा टप्प्यांपर्यंत देण्यात आले आहेत. मात्र, आता या योजनेचा लाभ पात्र शेतकर्‍यांना मिळावा, यासाठी शासनाने ई-केवायसी सक्तीची केली आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी शासनाच्या पोर्टलमध्ये सातत्याने व्यत्यय येत असून, सध्या तर हे पोर्टल बंदच आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा मनस्ताप वाढला आहे. शेतकर्‍यांनी ३१ मार्चपूर्वी केवायसी केली नाही तर त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. शेतकर्‍यांना मुदतीपूर्वी ई-केवायसी करावी लागणार असल्याने चिंता वाढली आहे. शेतकर्‍यांना केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चची डेडलाईन शासनाने दिली असली तरी शासनाची वेबसाईटच सध्या बंद असल्याने केवायसी करणे अवघड झाले आहे. या नोंदणीसाठी शासनाच्या पोर्टलवर लॉगिन करावे लागते. शासनाची वेबसाईट वारंवार हँग होत असते. सध्या तर ही वेबसाईट बंदच आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना केवायसी करण्यात अडथळा येत आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना गावातील महाई सेवा केंद्रात सातत्याने चकरा माराव्या लागत आहेत.