कातळशिल्प भागांचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:-कातळशिल्प या रत्नाचे महत्व ओळखून त्याचे पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास त्याचे अर्थाजनामध्ये रुपांतर होईल. यातून कातळशिल्प असलेल्या भागांचा विकास होऊन तेथील गावांचा कायापालाट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

थिबा पॅलेस येथे पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग, निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय, महाराष्‍ट्र शासन आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या कातळशिल्प पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन झाले, त्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

  यावेळी इन्फिगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, नालंदा विद्यापीठाचे प्रा. डॉ. तोसा बंता पधान, माहिती व जनसंपर्क विभागातील निवृत्त उपसंचालक सतीश लळीत, रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, उपाध्यक्ष उदय लोध, सुधीर रिसबुड, डॉ. सुरेंद्र ठाकूर-देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हयामध्ये 1600 पेक्षा जास्त असलेल्या कातळशिल्पाचा योग्य अभ्यास करुन त्याचे महत्व लोकांपर्यंत पोहचविले तर येथील पर्यटनाला अधिक चालना मिळून येथील गावांचा अर्थिकदृट्या विकास होऊन त्यांचा कायापालाट होईल. येथील तरुणांना रोजगारांसाठी बाहेर जावे लागणार नाही.

     ते म्हणाले, कातळशिल्प पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा वारसा, संस्कृती, वैवध्य, एतिहासिक महत्व जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कातळशिल्पे, खाद्यसंस्कृती आणि कोकणची खेळे नमन यांचे एकत्रित रोल मॉडेल बनवून  ज्या गावात कातळशिल्प आहेत, त्या गावांनी पुढाकार घेतल्यास जिल्हा समृद्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.