जिल्ह्याचा 11 कोटी 41 लाखांचा टंचाई आराखडा; 441 गावात टंचाईची शक्यता 

रत्नागिरी:- तालुकास्तरावरुन आराखडे उशिरा प्राप्त झाल्यामुळे विलंबाने का होईना पण जिल्ह्याचा टंचाई आराखडा अखेर मंजुर झाला. ४४१ गावात टंचाईची जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन ११ कोटी ४१ लाख ४३ हजार रुपयांची तरतुद केली आहे. यंदा पाणी योजनांच्या दुरुस्तीबरोबर नवीन विंधन विहिरींसाठी जादा निधी ठेवला आहे. यावर्षी जलजीवन मिशनमधून पाणी योजना दुरुस्ती आणि नुतनीकरण केले जात असल्याने टंचाई आराखडा सोळा कोटीवरुन खाली आला आहे.

जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलेला टचाई आराखडा मंजूर झाला असून त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. मागील चार वर्षात टंचाई आराखड्यांमध्ये नळपाणी योजनांच्या दुरुस्तीला जादाचाी तरतुद केली जात होती. त्यामुळे आराखडा तीन कोटीवरुन सोळा कोटीवर पोचला. गतवर्षी सोळा कोटींपैकी अकरा कोटी रुपये पाणी योजना दुरुस्तीसाठी होते. यावर्षीपासून केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक पाणी योजनांची दुरुस्ती, नवीन योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे टंचाई आराखड्यातील योजना दुरुस्तीचे प्रस्ताव कमी असून यंदाचा टंचाई आराखड्यात चार कोटींची कपात केली गेली. जलजीवन मिशनची कामे वेगाने चालू झाली असून पुढील दोन वर्षात बहूसंख्य कामे पूर्ण होतील. त्यावेळी आराखड्यात मोठी घट होणार आहे.

जिल्ह्यात ४४१ गावातील ९५२ वाड्यांना टंचाईची झळ पोचू शकते अशी शक्यता आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी ११ कोटी ४१ लाखाचा आराखडा मंजूर केला आहे. त्यात ४७४ नवीन विंधन विहिरींसाठी ३ कोटी ७९ लाख, ९८ पाणी योजना दुरुस्तीला ५ कोटी ७९ लाख, विहिर खोलीकरणात २० गावांसाठी ४२ लाख, ९ नपापु दुरुस्ती ८० लाख, टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ४० टँकरला ६० लाख ८८ हजार रुपयांची तरतुद केली आहे. दरवर्षी टँकरवर ३५ लाख रुपयांचा खर्च केला जातो. यंदा तो वाढवण्यात आला आहे.