…तर रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक: ना. सामंत

रत्नागिरी:- रिफायनरी येऊन येथील बेरोजगारी मिटणार असेल, नागरिकांच्या समस्या सुटणार असतील तर रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक आहे. स्थानिक लोकांच्या मागणीवर शिवसेनेचे मत अवलंबून आहे. त्यांचे गैरसमज दूर करावेत व चांगले पॅकेज द्यावे अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी रिफायनरी विदर्भात पाठवावी या  वक्तव्यावर ना. सामंत यांनी पत्रकार परिषदेत उत्तर देताना सांगितले की, नाणार बाबत स्थानिकांचा प्रखर विरोध होता. त्यामुळे शिवसेना नाणारवासियांच्या मागे उभी राहिली. मुख्यमंत्र्यांनी त्याठिकाणी रिफायनरी होणार नाही हा ग्रामस्थांना शब्द दिला होता. तो शिवसेनेने पाळला. आता नाणार सोडून अन्य गावातील ग्रामस्थ रिफायनरीची मागणी करीत असतील व त्यामुळे येथील बेरोजगारीचा प्रश्न सुटणार असेल तर शिवसेना ग्रामस्थांसोबत असेल. शिवसेना उद्योगांच्या विरोधात कधीच नव्हती, फक्त तेथील जनतेचा विरोध त्या उद्योगांना असता कामा नये एवढीच भूमिका होती.
रिफायनरीबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये गैरसमज असतील ते प्रशासनाने दूर करायले हवेत. या प्रकल्पामुळे काय फायदे आहेत, त्याचीही माहिती करुन देणे आवश्यक आहे. येथील जमीन मालकांना चांगले पॅकेज द्यावे. ज्यामुळे जमीन मालकांनाही न्याय मिळेल. कोणत्याही प्रकल्पाबाबत लोकांच्या मागणीवर शिवसेनेची भूमिका नेहमीच अवलंबून राहिली असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.