जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील सात शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित होणार

रत्नागिरी:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य शासनस्तरावरून घेण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ७ शाळांचा समावेश झाला आहे. या शाळांना निधीही वितरीत करण्यात आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, पूर्वीच्या महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या ८१ शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने व नागरी भागातील शाळा यांचा समावेश करण्यात येउन त्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण ४८८ आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय झालेला आहे. या शाळांपैकी प्राथमिक व उच्च प्राथमिक २९३ शाळा व माध्यमिक व उच्च माध्यमिक ६२ शाळा अशा एकूण ३५५ शाळांची दुरूस्तीसाठी अंदाजपत्रके शासनाकडे प्राप्त झाली. त्या शाळांना लहान बांधकामासाठी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्यावतीने निधी वितरीत करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. राज्यातील एकूण ३५५ शाळांना लहान बांधकामासाठी शासनाकडून ५३ कोटी ९७ लाख १५ हजारांचा निधी खर्च करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या आदर्श शाळां विकसित करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातीलही ७ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात न.प.शाळा नं. १५ दामले विद्यालय (रत्नागिरी), जि.प.नूतन विद्यामंदिर (मंडणगड), जि.प. फणसू शाळा (दापोली), जि.प.साखरी आगर नं. १ (गुहागर), जि.प.असनगाव नं. २ (खेड), जि.प.गर्व्हमेंट फिशरिज स्कूल साखरीनाटे(राजापूर), जि.प.आरवली नं. १ (संगमेश्वर) या शाळांचा समावेश आहे.