गतवर्षात आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण वाढून 92 टक्क्यांवर 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाने गतवर्षी दमदार कामगिरी करत ९२ टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल केले. गुन्हे प्रलंबित राहण्याचे प्रमाण अवघे ८ टक्क्यांवर आणण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये पुढचे पाऊल टाकत पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी गुन्हे उघडकीस आणताना सुसूत्रता यावी म्हणून डाटा तयार करण्यासाठी क्राईम मॉनिटरिंग सिस्टीम (गुन्हे नियंत्रण प्रणाली) विकसित केली आहे. या सॉफ्टवेअरचा वापर १ फेब्रुवारीपासून रत्नागिरी व लांजा पोलिस ठाण्यात सुरू झाला आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलिसदलात गुन्हे प्रलंबित राहण्याचे प्रमाण केवळ ८ टक्के आहे. राज्यातील पोलिस दलातील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. गुन्हे उकल करताना संबंधित सर्व यंत्रणांमध्ये सुसूत्रता यावी व एकत्रित माहिती तयार करण्यासाठी क्राईम मॉनेटरिंग सिस्टीम ही संकल्पना पुढे आणली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या सॉफ्टवेअरची निर्मिती रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाने केली आहे. महाराष्ट्रासह देशातील हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. पोलिसदलात काम करताना गुन्हे उघडकीस आणताना साक्षीदार, पुरावे फार महत्त्वाचे असतात. एखादा गुन्हा उघडकीस आल्यानंतर संबंधित सर्व विभागाचे सहकार्य फार महत्त्वाचे ठरते. गुन्हा उघडकीस आणताना सर्व यंत्रणांशी

 सुसूत्रता साधता यावी यासाठी ही प्रणाली काम करणार आहे. यासाठी सर्व पोलिस ठाण्याचे अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तपासकामात करता यावा, यासाठी हा प्रयत्न आदर्शवत आहे.

गुन्ह्याचा डाटा या प्रणालीत कायमस्वरूपी राहणार आहे. कोर्टात एखाद्या साक्षीदारांनी आपला जबाब फिरवला तरी पोलिसांकडे नेमका कोणता जबाब त्यांनी दिला होता, याची पडताळणी या प्रणालीद्वारे केली जाणार आहे. ही प्रणाली विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीद्वारे पोलिसदलाला निधी वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे

 ही प्रणाली विकसित करण्यास आर्थिक अडचण आली नसल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी सांगितले.

एखादा शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना वेळेत मिळत नसेल तरीही या प्रणालीद्वारे पाठपुरावा करून तो त्वरित मिळवण्यासाठी मदत होणार आहे. कोणत्याही गुन्ह्यात वेगवेगळ्या विभागांची मदत लागत असते. या सर्व समस्या या प्रकल्पामुळे मार्गी लागणार आहेत. कामकाज चालवताना अधिक पारदर्शकता येणार असून नियोजन व प्रणालीबद्ध कामकाज सुरू राहील.