प्राथमिक शिक्षक बदल्या; पोर्टलवर माहिती अपडेटसाठी 25 मार्चपर्यंत मुदत

नियोजनासाठी गटशिक्षणाधिकार्‍यांना सुचना

रत्नागिरी:- दोन वर्षे रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया चालू झाली असून जिल्हा बदली पात्र शिक्षकांची नावे, मोबाईल नंबर, मेल आयडी, आधार क्रमांक यासह अन्य आवश्यक माहिती 25 मार्चपर्यंत शालार्थ पोर्टलवर भरण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकारांना देण्यात आले.

शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मागील आठवड्यात दृकश्राव्य माध्यमाद्वारे सचिव श्री. कुमार, उपसचिव प्रवीण जैन, के. जी. वळवी यांनी विविध जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यात बारा विषयांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या बदल्यासाठी यू डायसनूसार शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्यावत करणे, शिक्षकांचे रोष्टर अद्ययावत करून त्यास विभागीय आयुक्तांची मंजुरी घेणे, अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणे, शिक्षकांचे आधार अपडेट करणे, शिक्षकांचे समानिकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या नेमणूका करणे आदी विषयाचा समावेश होता. शिक्षकांच्या बदल्यासाठी आवश्यक माहिती अपडेट करण्यासाठी 25 मार्चची मुुदत दिली गेली आहे. त्याची माहिती देण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वामन जगदाळे यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना माहिती दिली. शिक्षकांनी माहिती काळजीपूर्वक दुरूस्त करून अचूकपणे भरावी अशा सुचना दिल्या आहेत. सर्व माहिती इंग्रजीत असावी, शिक्षकांची बदलेल्या माहितीचा रंग पिवळा असावा, बदलून आलेल्या शिक्षकांच्या नावाचा रंग लाल असावा, शिक्षकांच्या जन्म तारीख काळजी भरावी, बारा अंकी आधार नंबर अचूक असावा, पॅन नंबर व शालार्थ आयडीत कोणताही बदल करू नयेत अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

31 मे पुर्वी बदल्या निश्‍चित

दरवर्षी साधारणपणे 31 मे पुर्वी शिक्षकांच्या बदल्या होतात. मात्र, दोन वर्षापासून कोविडच्या संसर्गामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यातील तयारी सुरू झाली आहे. शिक्षकांसाठी बदल्या ही मोठी बाब असून बदलीत शिक्षकांची गैरदूर होते. शिक्षकांच्या बदलीत चार प्रकार असून संवर्ग एक आणि दोन पत्नी-पत्नी एकत्रिकरण आणि सेवाज्येष्ठतेने शिक्षकांना बदली करता येते. दोन वर्षापासून बदली होत नसल्याने शिक्षकांना मोठ्या गैरसोयीला समोरे जावे लागत होते.