रत्नागिरी ते वेर्णा रेल्वे मार्गाची सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी रत्नागिरी ते वेर्णा (गोवा) या मार्गावर बोगदे, पुल येथील सुमारे सात ठिकाणी कामांची तपासणी केली. गुरुवारी सुरक्षेसाठीची रेल्वे रत्नागिरीतून सोलापूरला रवाना झाली. 

रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा नेतृत्वात सलग तिन दिवस ही तपासणी होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर गेल्या 6-7 वर्षांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू होते. मुंबई ते रोहा असे कोकण रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाड्या आणि पॅसेंजर रेल्वे विद्युत इंजिनावर चालवली जाते. आता रत्नागिरी ते वेर्णा या टप्प्यातील विद्युतीकरणही पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या नेतृत्वाखाली 22 पासून सुरू झाली. बुधवारी रात्री उशिरा 7 बोगींची विजेवरील विशेष गाडी रत्नागिरीतून वेर्णाकडे रवाना झाली. तेथून कोकण रेल्वे मार्गाची पाहणी सुरु झाली. या तपासणीत रत्नागिरी ते वेर्णा मार्गावरील पानवल पूल, निवसर आडवली दरम्यानचे रेल्वे वळण, आडवली यार्ड, बेर्डेवाडी टनेल, विलवडे सौंदळ दरम्यानचे डोंगर कटींग, राजापूर एसएसपी, वैभववाडी अचिर्णे दरम्यानचे एलसी गेट, कणकवली टीएसएस आणि ओव्हरहेटड वायर डेपो, कणकवली सिंधुदुर्ग दरम्यानचे एलसी गेट 25, सिंधुदुर्ग कुडाळ दरम्यान कर्ली नदी पूल, झाराप एसपी, पेडणे टनेल यांची पाहणी करण्यात आली. कोकण रेल्वे मार्ग दर्‍या-खोर्‍यातून गेल्यामुळे विद्युतीकरणाचे काम आव्हानात्मक होते. पुल आणि टनेलमध्ये ही व्यवस्था कशापध्दतीने करण्यात आली आहे, याकडे सर्वाधिक लक्ष या पथकाने ठेवले होते. यावेळी अभियंत्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.
सुरक्षेवेळी करण्यात आलेल्या सुचनेनुसार तत्काळ दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानंतर अहवाल तयार करुन पुढील काही दिवसात गाड्या विजेवर सोडण्यात येणार आहेत. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचा वेग वाढणार असून प्रवास अधिक जलद होईल. याशिवाय डिझेलच्या खर्चात कपात होऊन प्रदूषण रोखण्यासही मदत होणार आहे.