वातावरणातील बदल आणखी दोन दिवस राहणार कायम 

रत्नागिरी:- आग्नेय बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या अस्थिर झालेल्या हवामान बदलाचा परिणाम रत्नागिरीतही पहायला मिळत असून, रविवारी दिवसभर जिल्ह्यात मळभयुक्त वातावरण होते. सोमवार आणि मंगळवारी वातावरण असेच राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

फयान, निसर्ग, तोक्ते या चक्रीवादळामुळे कोकणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बागायदार निसर्ग वादळात तब्बल 25 वर्षे मागे गेला आहे. मच्छीमारांचेही निसर्ग वादळात प्रचंड नुकसान झाले होते. आता आंबा पीक तयार होत असल्याने निसर्गदेवतेने पुन्हा परीक्षा पाहू नये, अशी प्रार्थना कोकणवासीय करतात.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अंदमान, निकोबार व बंगालचा उपसाग या भागातील हवामान बदलामुळे तेथे वादळसदृश्य परिस्थिती उद्भवल्यास तेथील मच्छिमारांच्या बोटींना कोकणच्या सागरकिनारी भागात आश्रय देण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला करण्यात आली आहे.

‘आयएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात गुरुवारी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. पुढील तीन दिवसांत या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे.

समुद्रावरून उत्तरेकडे सरकताना या क्षेत्राचा प्रवास अंदमान – निकोबार बेटांच्या जवळून होणार असल्यामुळे या बेटांना जोरदार वारे आणि पावसाचा फटका बसू शकतो. आज, सोमवार (दि.21) हंगामातील पहिले चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून, मंगळवारी (दि.22) रोची हे चक्रीवादळ म्यानमार-बांगलादेशच्या किनारपट्टी जवळ पोहचेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.