मत्स्य शेती जोडधंदा करून रोजगाराच्या संधी निर्माण करा: डॉ.गर्ग

रत्नागिरी:- मत्स्य संवर्धनातील प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थींनी मत्स्य शेती हा जोड धंदा करून रोजगाराची संधी निर्माण करून चरितार्थ चालवावा, असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त शिरगांव मत्स्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाची मुळाक्षरे व संमिश्र मत्स्यशेती या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे, डॉ. सुरेश नाईक, डॉ. केतन चौधरी उपस्थित होते.

डॉ. गर्ग म्हणाले की, निर्यातक्षम मत्स्यसंवर्धन करून देशाला परकीय चलन मिळवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे. देश ने हमें बहुत कुछ दिया है, हमे भी देश को कुछ देना चाहिए. देशाचे ऋण फेडण्याची संधी यानिमित्ताने सर्व प्रशिक्षणार्थींना मिळाली आहे, ती त्यांनी साधून घ्यावी.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे म्हणाले, मत्स्य महाविद्यालय कौशल्यभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम नेहमीच राबवित असते, त्यातून स्वयंरोजगार निर्मितीसाठी तांत्रिक मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना दिले जाते. भविष्यात मत्स्य महाविद्यालयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतलेले अनेक उद्योजक निर्माण होतील.

या कार्यक्रमाचे आयोजक विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी समारोप समारंभाच्या प्रास्ताविकात निशुल्क प्रशिक्षणाचा लाभ हा आपल्या कुटूंबाला उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करण्यासाठी केला तर या प्रशिक्षण कार्यक्रमाचा हेतू साध्य झाला असे मानता येईल असे सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाने संयुक्त पणे राबवविलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेवून स्वत:ची आणि देशाची प्रगती करावी असे आवाहन केले.

या प्रशिक्षणात राज्याच्या विविध भागातून 50 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रीय मत्स्यकी विकास मंडळ, हैदराबाद ने प्रायोजित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व प्रशिक्षणार्थींना सकाळची न्याहारी, दुपारचे भोजन, सायंकाळचा चहा व येण्या-जाण्याचा किमान खर्च देण्यात आला. सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास वासावे यांनी तर आभार भालचंद्र नाईक यांनी मानले.