आरक्षणामुळे निवडणुका पुढे जातील या भ्रमात राहू नका: आ. जाधव 

रत्नागिरी:– राज्य सरकारने कायदा करुन निवडणुकीचे अधिकार आपल्याकडे घेतले असले तरीही 74 व्या घटनादुरुस्तीनुसार निवडणुकीचे अधिकार पुर्णपणे निवडणुक आयोगाकडे आहे. त्यामुळे ते भुमिका घेतात हे पहावे लागणार आहे. त्यामुळे आरक्षणामुळे निवडणुका चार, सहा महिने पुढे जातील असे समजून कुणीच राहू नका, निवडणुक उद्याही होईल हे समजून जागृक रहा, असा सल्ला आमदार भास्कर जाधव यांनी इच्छुकांना दिला आहे.


रत्नागिरीतील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषद सदस्यांनी गेल्या पाच वर्षांत चांगले काम केले आहे. त्यामुळे बहूतेक सगळ्यांना पुन्हा संधी मिळेल. सध्या ओबीसी आरक्षणामुळे निवडणुक पुढे गेली आहे. राज्यातील महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुक घ्यावी असे धोरण निश्‍चित केले आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे मध्ये अडचण झाली होती. त्यानंतर काहींनी सत्ता आमच्याकडे द्या, आम्ही आरक्षण देतो असे पसरवण्यास सुरवात केली होती. आरक्षण देण्यासाठी सत्ता कशाला पाहीजे, आरक्षणासाठी काय करायला पाहीजे ते सांगा सरकार करुन देईल. तुमच्याकडे जी जादूची छडी की कांडी आहे, ती आताच सांगा. तुम्ही ती कांडी फिरवा आम्ही आरक्षण देतो. यासाठी विरोध कुणालाच नाही. विरोधक फक्त आश्‍वासने देत आहेत. मात्र 74 व्या घटना दुरुस्तीनुसार निवडणुका घेण्याचा अधिकार पूर्णपणे निवडणूक आयोगाचा आहे, राज्य सरकारचा नाही. सरकारने जरी कायदा केला असला तरीही निवडणुक आयेाग काय भुमिका घेईल हे माहीत नाही. या कायद्याबाबत मला स्वतःला संशय आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आरक्षणामुळे चार, सहा महिने पुढे जातील असे समजून कुणीच राहू नका. निवडणुक आयोग त्या उद्यापण घेतील असे समजून जागृक राहा.

उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करा: जाधव

उत्पन्न वाढवून जिल्हा परिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे. सध्या स्वतःचे उत्पन्न नाही. केंद्र, राज्य, जिल्हा नियोजनच्या निधीवर सर्वांना अवलंबून राहावे लागते. उत्पन्न वाढीचे पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. जिल्ह्याला पर्यटनासह समुद्र किनार्‍याचे वरदान आहे. त्याचा उपयोग करुन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे नवनवी संकल्पना मांडाव्यात निश्‍चितच यामधून रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होईल, असा विश्‍वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.