रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्याकडे

रत्नागिरी:- येथील विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. भूसंपादन केलेल्या जागेसाठी हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्याला दिलेला ६० दिवसांचा कालावधी संपत आल्याने त्यावर सुनावणी झाल्यानंतर जमीन मालकांना नोटीस पाठविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया साधारणत: जूनअखेरपर्यंत पूर्ण हाेणार आहे.

रत्नागिरी एम.आय.डी.सी. भागात १९७३ साली विमानतळाची निर्मिती करण्यात आली. या विमानतळावरून नागरी वाहतूक सेवाही काही काळ सुरू झाली होती. वायुदूत या कंपनीने ‘रत्नागिरी – मुंबई’ अशी ही वायूसेवा सुरू ठेवली होती. ही सेवा १९९७ सालापर्यंत सुरू होती. मात्र, ती बंद झाली. त्यानंतर १९९७ साली या विमानतळाचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात आला. १४० एकर शासकीय जमिनीसह हे विमानतळ संरक्षण मंत्रालयाच्या भारतीय तटरक्षक दलाकडे २०१० साली हस्तांतरित करण्यात आले. तेव्हापासून तटरक्षक दलाच्या विमानांसाठी हे विमानतळ वापरले जात आहे.

२३ ऑगस्ट २०१६ रोजी या विमानतळाचा उड्डाण योजनेत समावेश झाला. त्यामुळे पुन्हा नागरी वाहतूक सेवेसाठी विमानतळ उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी ३३ हेक्टर आर क्षेत्राची आवश्यकता आहे.

तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या विमानतळाची लांबी सर्व मिळून २१०० मीटर इतकी आहे. धावपट्टी सध्या तयार असली तरी नागरी वाहतूक सेवेसाठी या परिसरात विमाने थांबविण्यासाठी वेगळी जागा आवश्यक असल्याने त्यासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. याकरिता मिरजोळे आणि तिवंडेवाडी या दोन गावांमधील २८ हेक्टर क्षेत्र संपादित केले जात आहे. मिरजोळे येथील ८ हेक्टर आणि तिवंडेवाडी येथील २० हेक्टर मिळून २८ हेक्टर क्षेत्र संपादित केले जात आहे. ही प्रक्रिया आता पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे भूसंपादनानंतर विमानतळ उभारणीच्या कामाला वेगात प्रारंभ होणार आहे.

या सर्व क्षेत्राची संयुक्त मोजणी ७ ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत पूर्ण झाली आहे. भूसंपादन कायदा २०१३ नुसार ३० डिसेंबर २०२१ रोजी भूसंपादनाबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यावर ६० दिवसांच्या आत हरकती मागविण्यात आल्या आहेत. हा कालावधी आता संपला असून, आलेल्या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर त्याबाबतची अंतिम १९ क्रमांकाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.- डाॅ. विकास सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी

रत्नागिरी विमानतळ भू संपादनासाठी १०० कोटी

 काल सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये यावेळी रत्नागिरी जिल्ह्याच्या पदरात अनेक विकासात्मक कामे पडली आहेत. अनेक वर्षे रखडलेल्या रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादन व बांधकामासाठी १०० कोटींची तरतूद केली आहे.