ऐन शिमगोत्सवात रेशन दुकानात धान्याचा खडखडाट

रत्नागिरी:- फेब्रुवारी महिन्याच्या धान्याचा पुरवठा अजूनही रेशन दुकानांना झालेला नाही. या महिन्यात ई-पॉस मशीनवर पूर्ण महिना तांत्रिक अडचण निर्माण झालयाने कार्डधारकांना धान्य वितरण करता आलेले नाही. तसेच मार्च महिन्याच्या धान्य पुरवठ्याचीही अजून प्रतिक्षा लागून राहिलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 972 रेशन दुकानांमधून कार्डधारकांना ऐन शिमगोत्सवाच्या तोंडावर रेशन दुकानांतून धान्य मिळणे थांबलेले आहे. पण जिल्हा पुरवठा विभागाकडून त्याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे सांगिलते जात आहे.

रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेने त्याबाबत येथील जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. ही जिल्हा संघटनाही रीतसर नोंदणीकृत संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून जिह्यातील रास्तदर धान्य दुकानदार , केरोसीन परवाना धारकांच्या अडचणी सोडवण्याचे काम करीत आहे. गेल्या फेब्रुवारी 2022 मध्ये ई-पॉस मशीनवर पूर्ण महिना तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे कार्डधारकांना रेशन दुकानांमधुन धान्य वितरण करता आलेले नसल्याचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी सांगितले आहे.

तसेच धान्य साठा सुद्धा पुरेसा दुकानात उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे कार्डधारक अध्याप धान्यापासून वंचित आहेत. अजुन सुद्धा ई-पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणीमध्ये सुधारणा झालेली नाही. तसेच जानेवारी 2022 चे सुद्धा काही कार्डधारक धान्यपासुन वंचित आहेत. याकडे वारंवार रेशनदुकानदार संघटनेने पुरवठा विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे. पण त्याकडे प्रशासनस्तरावर कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्याठिकाणी जिल्हा पुरवठा विभागातील अधिकाऱयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला तेथील जबाबदार अधिकारी बाहेर दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची या प्रश्नी भेट घेतली. त्यांच्याशी या होत नसलेल्या धान्य पुरवठ्याबाबत चर्चा केली. संबधित विभागाला शिष्टमंडळाने दिलेले निवेदन पाठविण्यात येउन त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या जातील असे सांगण्यात आले. पण धान्य वितरणाच्या या पश्नावर ठोस चर्चा न झाल्याने रेशनदुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाचे समाधान झाले नाही. ग्राहकांच्या या पश्नी प्रशासनाकडून ठोस कार्यवाही केली जात नसल्याने शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. वखार महामंडळातील मजूरांचा संपावर पशासनाकडून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नसल्याने हा पश्न आणखीन गंभीर बनला आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे जानेवारी 2022 व फेब्रुवारी 2022 चे नियमित व मोफत धान्यापासून कोणीही कार्डधारक पंचित रहाता कामा नये व सध्या जिह्यात शिमगोत्सव चालू होत आहे. त्यामुळे लाभार्थीना मार्च, 2022 अखेरपर्यंत ई-पॉस मशिनवर कैरी फॉरवर्ड करून मिळाल्यास धान्य वितरण करणे सुलभ होईल अशी मागणी करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी सांगितले.

सतत सर्व्हर प्रॉब्लेम येत असतो सध्या दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉस मशिन ह्या पुर्णत नादुरुस्त झालेल्या आहेत. त्यामुळे धान्य वितरण करणे फार कठीण झालेले आहे. मार्च अखेर पर्यंत धान्य वितरण करुन जिल्ह्यातील सर्व ई-पॉस मशिन प्रत्येक तहसिल कार्यालयात जमा करण्याचा जिह्यातील दुकानदारांच्यावतीने एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. तसेच एक अशी विनंती करण्यात येते की, रास्त दर धान्य दुकान दैनंदिन वितरण प्रणालीबाबत व अधिक यांच्याकडून तपासणीवेळी दुकानात आवश्यक असलेल्या दस्तऐवजाबाबत एक जिल्हास्तरावर मार्गदर्शन घेण्यात यावे. जेणेकरून तपासणीवेळी दुकानदारांना अडचणी निर्माण होणार नाहीत. वरील मुद्यांवर तात्काळ विचार करुन आम्हा जिल्ह्यातील रास्तदर धान्य दुकानदारांना न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भेटीवेळी नितीन कांबळे(रत्नागिरी), संतोष देसाई (गुहागर), मनोहर इंदुलकर (राजापूर), विकास चव्हाण (लांजा), नरुद्दीन सय्यद (लांजा), अनंत केंद्रे ( मंडणगड) यांचा समावेश होता.