जिद्दीची कमाल! ठिसुळ मातीमधून ‘भिमाची काठी’ सुळका सर

रत्नागिरी:- उन्हामुळे भुसभुशीत झालेल्या मातीवरुन तीनवेळा मुख्य पर्वतारोही (क्लायंबर) खाली घसरला. पण जिद्द आणि सुरक्षेची अत्याधुनिक साधनांमुळे ज्या वेगाने तो खाली आला, तेवढ्याच जिद्दीने त्यांनी सुळका सर करण्यास आरंभ केला. चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर दोन तासात ‘भिमाची काठी’ हा सह्याद्रीच्या रांगांमधील बिरमणी (पोलादपूर, जि. रायगड) येथील सुळका रत्नागिरीच्या जिद्दी माउंटेनेरिंगने सर केला.


भिमाचा काठी सुळका एका बाजूने दीडशे फुट तर पलिकडील बाजूने 180 फुट उंचीचा आहे. जगबुडी नदीचे उगम स्थान याच बिरमणीजवळ आहे. तेथे उंच खळाळणारा धबधबाही आहे. बिरमणीतील कुडपन गावाजवळ सुळका आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगानी वेढल्याने कुडपन हे नाव पडले. हा अरविंद नवेले, प्रसाद शिगवण आणि आकाश नाईक यांनी यशस्वी प्रयत्न केले. तेथील खिंडीत पोहोचण्यासाठी दोनशे फूट अगदी नव्वद अंशाच्या कड्यावरून पुढे जावे लागते. सकाळी साडेआठ वाजता सुळका सर करण्यास सुरुवात केली. साडेनऊ वाजता दोघे खिंडीत पोहोचले. सुरवातीला तिस फुटावर गवतात लपलेला पुर्वीच्या पर्वतारोहीनी मारलेला एक पॉइंट मिळाला. तेथून पुढे दहा फुटांवर एक छोटं झाड होते. तिथे प्लेसमेंट टाकली आणि विस फूटावर स्टेशन बनवले. पुढे दहा फुटांवरती एक पॉइंट मिळाला आणि तेथून पन्नास फूटावर मोठं झाड होते. तेथे दुसरं स्टेशन बनवले. त्यापुढील साठ फुटाचा टप्पा पूर्णपणे ठिसूळ मातीचा होता. वर चढताना दोन ठिकाणी छोट्या झाडांचा आधार मिळाला. खरी परिक्षा याच टप्प्यात होती. सुरवातीला कडक खडकामुळे वर चढणे सोपे गेले; मात्र ठिसुळ मातीमुळे अरविंद नवेले तिनवेळा खाली घसरले. पण जिद्दीने पुढे सरकले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुळक्याचा माथा गाठण्यात यश आले. दुसर्‍या बाजूची चढाई दोन तासाने सुरु केली. त्या बाजूला नव्वद फुटांवर असेला एक क्रॅक पार करणे आवाक्यात आल्यानंतर 180 फुटांची ती कातळभिंत सर करायला आरंभ केला. दोन झाडाच्या मुळांचा, तिन छोटी मनगटा एवढी झाडं, एक रॉक आणि दोन पॉइंट यांचा आधार घेत त्या बाजून माथा गाठता आल्याचे पर्वतारोहींनी सांगितले.