राजापूर येथील बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात?

राजापूर:- शहरातील चव्हाणवाडी येथून सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रानतळे येथील सड्यावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर तसेच डोक्यावर मारहाणीच्या खुणा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. राजेश वसंत चव्हाण (वय ४०, रा. चव्हाणवाडी राजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चव्हाणवाडी येथील सलून व्यवसायिक राजेश चव्हाण हे सोमवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कोठेही आढळून आले नाहीत. अखेर मंगळवारी सकाळी त्यांच्या पत्नीने राजापूर पोलीस स्थानकात ते बेपत्ता झाले असल्याची फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा तपास केला असता राजेश यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन रानतळे येथे मिळाल्याने रानतळे परिसरात शोध घेण्यात आला. मंगळवारी सायंकाळी रानतळे पिकनिक स्पॉटपासून काही अंतरावर धोपेश्वर गुरववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या सड्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची खबर मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, राजेश याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला तसेच चेहऱ्यावर जोरदार मार लागला होता. चेहरा रक्ताने माखलेल्या स्थितीत होता. तसेच राजेशच्या मृतदेहापासून काही अंतरावर त्याचा मोबाईल फोडलेल्या अवस्थेत आढळून आला. तर मृतदेहाजवळ ग्लास व खाद्यपदार्थही आढळून आले. त्यामुळे राजेश याचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रानतळे येथील वस्तीलगत हा प्रकार घडल्याने राजापुरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राजेश चव्हाण हा तरूण सलून व्यावसायिक म्हणून परिचित होता. पूर्वी जकातनाका येथे त्याचे सलून होते. आठ दिवसांपूर्वीच त्याने राजापूर ग्रामीण रूग्णालयासमोरील गाळ्यांमध्ये नवीन सलूनचे दुकान सुरू केले होते. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच अनेकांनी रानतळे येथे धाव घेतली.