फलोत्पादन, मत्स्य उत्पादनासाठी कोकणात उभारणार 11 समूह केंद्रे

रत्नागिरी:- कोकण  कृषी निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून तयार करणे, कृषी निर्यातीत उद्योजकता विकास, कृषी मालाची निर्यात वाढवणे, तसेच सेंद्रीय, पारंपरिक कृषी उत्पादनांची निर्यात वाढवणे, त्यासाठी पायाभूत सुविधांना चालना आणि बाजारपेठेचा विकास यांसह विविध फलोत्पादनासह मत्स्य उत्पादनासाठी कोकणातील जिल्ह्यात 11 समूह केंद्रे (क्लस्टर) स्थापन करण्यात येणार आहे.

कोकण प्रामुख्याने मासे आणि फलोत्पादनासाठी अग्रणी आहे. कोकणातील तीन उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील  चिकू, रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आणि रायगड येथील पांढरा कांदा या तीन उत्पादनांचा समावेश आहे. यासाठी  प्रस्तावित समूह केंद्रांच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक यंत्रणा तयार करणे या महत्त्वाच्या उद्दिष्टांचा समावेश कृषी निर्यात धोरणात करण्यात आला आहे.

पिकांच्या निर्यातक्षम प्रजातींची आयात, संशोधन व विकास, कीडमुक्त क्षेत्र घोषित करणे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, नाशवंत कृषी मालासाठी शित आणि प्रमाणिकरण व्यवस्थापन, सागरी शिष्टाचार विकसित करणे आदीसाठी ही समूह केंद्रे संचालित करणार आहे. केंद्रांसाठी  बंदरे, रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधा उभारणे, पॅक हाऊस, निर्यात सुविधा केंद्र, शीतसाखळी आणि विशेष प्रक्रिया केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.

भौगोलिक मानांकनानुसार समूह केंद्रे
समुह केंद्रात केंद्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू, कोकम, पालघऱ जिल्ह्यातील चिकू, रायगडमधील पांढरा कांदा आदी पीकनिहाय आणि किनारी तालुक्यात मत्स्य उत्पादनानिहाय  केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये पालघरमध्ये घोलवड, पालघर आणि डहाणू, रायगडात अलिबाग आणि रोहा, रत्नागिरीमध्ये रत्नागिरी, राजापूर, गुहागर आणि दापोली आणि सिंधुदुर्गात सावंतवाडी आणि मालवण येथे समूह केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.