बारावीच्या ऑफलाईन परीक्षा आजपासून; कोकण बोर्डातून 31 हजार 526 विद्यार्थी देणार परीक्षा

रत्नागिरी:- कोकण परिक्षा मंडळामार्फत आज शुक्रवार 4 मार्चपासून बारावीच्या परिक्षेला प्रारंभ होत असून रत्नागिरी जिल्ह्यात 185 परिक्षा केंद्रावर एकूण 19 हजार 433 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोकण बोर्डातून एकूण 31 हजार 526 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येउन ‘शाळा तिथे परिक्षा केंद्र’ ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. एका शाळेत 15 पेक्षा जास्त परीक्षार्थी असतील तिथे परीक्षा केंद्र आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा द्यायची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यंदा परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ देण्यात आला आहे. परीक्षा अर्धातास अगोदरच सुरू होईल. त्याआधी दहा मिनिटे म्हणजे 10.20 वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत.

परिक्षा पारदर्शक होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजना केलेले आहे. 15 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परिक्षा केंद्र, उपकेंद्र. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधीलच अंतर्गंत व बहिस्त परिक्षक नियुक्त्या. लेखी परिक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे वेळ मिळणार आहे. लेखी परिक्षेच्या 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे जादा वेळ दिला जाणार आहे. मुख्य परिक्षा केंद्रावर थ्री लेअर पाकीटात प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. या वर्षांपासून प्रश्नपत्रिका प्रत्येक पाकीट विद्यार्थ्यांच्या समोरच फोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पाकीटात 25 प्रश्नपत्रिकाच असणार आहेत.

परिक्षेवेळी गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नजर राहणार आहे. परिक्षा केंद्राच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱयांची देखील बंदोबस्त नेमणूका करण्यात येणार आहेत. 12 वीची परीक्षा सकाळसत्रात 10.30 वाजता व दुपारसत्रात 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना एसटी बसेसच्या विशेष सेवेची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिक्षा केंद्रांवर थर्मल स्किनींगसाठी परिक्षेच्या वेळेपूर्वी किमान एक ते दीड तास अगोदर परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे. विद्यार्थ्याचे तापमान तपासल्यानंतर प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी किमान 30 मिनिटे अगोदर आपल्या निर्धारित परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे. प्रत्यक्ष लेखी परीक्षा सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येईल. एखादया परीक्षार्थ्यास कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने त्रास झाल्यास व त्याची परीक्षा देण्याची इच्छा असल्यान परीक्षार्थ्यांच्या संमतीने त्याची परीक्षा केंद्रात स्वंतत्र कक्षात बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना पत्येक शाळास्तरावर देण्यात आल्या आहेत.