महावितरणची थकबाकी डोक्यावरून खांद्यावर

२४ कोटी ४२ लाख थकीत ; २४७ ग्राहकांना शॉक

रत्नागिरी:- महावितरण  कंपनीची थकबाकी डोक्यावरून खांद्यावर आली आहे. जिल्ह्यातील ९८ हजार ५७५ ग्राहकांची अजून २४ कोटी ४२ लाख थकबाकी आहे. फेब्रुवारी २०२२ अखेरपर्यंतची ही आकडेवारी आहे तर जुनी थकबाकी असलेल्या २४७ ग्राहकांना कंपनीने जोरदार झटका दिला असून त्यांचा वीजपुरवठा कायमचा खंडित केला आहे. २०२ थकबाकीदार ग्राहकांचा तात्पुरता विद्युत पुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे.  महावितरणची कठोर कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरवावे, असे आवाहन कंपनीने केले आहे.

थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने काही कठोर पावले उलली आहेत. थकबाकीमुळे कंपनीच आर्थिक संकटात आल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी महावितरणची ही थकबाकी ६२ कोटी होती. त्यानंतर ती ५२ कोटीवर आली. कंपनीने वसुलीसाठी जोरदार पावले उचलल्याने थकबाकीचा बोजा आता डोक्यावरून खांद्यावर आला आहे. जिल्ह्याची एकूण थकबाकी आता २४ कोटी ४२ लाख एवढी आहे. ९८ हजार ५७५ ग्राहकांकडून ही थकबाकी वसूल करायची आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील घरगुती ७८ हजार ७५७ ग्राहकांची ६ कोटी ४८ लाख एवढी थकबाकी आहे. वाणिज्य ९ हजार ३७१ ग्राहकांची ३ लाख, औद्योगिक ८६२ ग्राहकांची १ कोटी ६ लाख, पथदिव्यांची १ हजार ४४६ ग्राहकांची ९ कोटी ७५ लाख, पाणीपुरवठा ९९० ग्राहकांची १ कोटी ८४ लाख, ५ हजार ६९ कृषी ग्राहकांची ८३ लाख तर सार्वजनिक सेवेतील २ हजार ८० ग्राहकांची १ कोटी १९ लाख अशी एकूण ९८ हजार ५७५ ग्राहकांची २४ कोटी ४२ लाख एवढी थकबाकी आहे. जिल्ह्यातील पथदिव्यांची सर्वांत जास्त थकबाकी  आहे.

महावितरण कंपनीने अनेक आवाहने करून आणि नोटिसा देऊनही काही ग्राहकांनी या थकबाकीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा ग्राहकांना कंपनीने जोरदार शॉक दिला आहे. जिल्ह्यातील अशा २४७ ग्राहकांचा विद्युत पुरवठा कायमचा खंडित केला आहे तर थकबाकीकडे कानाडोळा करणाऱ्या २०२ ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी त्यांचा विद्युत पुरवठा तात्पुरता खंडित केला आहे.