कोरे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; 190 किमी मार्गावर 25000 व्हॉल्टने वीज प्रवाह सोडणार 

रत्नागिरी:-कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 28 फेब्रुवारीपासून रत्नागिरी ते थिवी या 190 किलोमीटर लांबीच्या मार्गावर टाकण्यात आलेल्या विद्युत वाहिन्यांमध्ये 25000 व्हॉल्टने वीज प्रवाह सोडण्यात येणार आहे.

काही दिवसापूर्वीच थिवी ते कारवार मार्गांवर विद्युतीकरणाची सुरक्षा आयुक्त यांच्याकडून चाचणी घेण्यात आली. कोकण रेल्वेच्या एकूण मार्गापैकी रोहा ते रत्नागिरी गेल्या वर्षीच विद्युतिकरण पूर्ण झाले आहे. आता केवळ थिवी ते रत्नागिरी हा 190 किमीचा टप्पा बाकी आहे. तो पूर्ण झाल्यावर संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग हा विजेवर रेल्वे धावण्यासाठी अनुकूल होईल. यामुळे प्रदूषण कमी होण्यासह सध्या डिझेलवर गाड्या चालवताना येणार्‍या खर्चाच्या तुलनेत वर्षाकाठी इंधन खर्चात मोठी बचत होणार आहे. 28 पासून रत्नागिरी ते थिवी ओहरहेड विद्युत लाईन 25000 वोल्टने चार्ज केली जाणार असल्याने वाहिनीखालील मार्गांवरून जाताना नागरिक तसेच वाहधारक यांनी काळजी घेण्याचे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने फिडर तसेच सब- स्टेशनच्या सानिध्यात येऊ नये, असे  आवाहन करण्यात आले आहे.