कोकणातील 1 लाख शेतकरी थकबाकीमुक्त

रत्नागिरी:- कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 नुसार कृषिपंपाच्या वर्षानुवर्षे थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या 50 टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या 31 मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येत आहे. कोकण प्रादेशिक विभागात सहभागी 6 लाख 19 हजार 285 पैकी 1 लाख 9 हजार 594 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहे.

कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत असून, मंगळवार (दि. 23) पर्यंत राज्यात 21 लाख 79 हजार 816 शेतकर्‍यांनी चालू वीजबिल व थकबाकीची काही रक्कम भरून सहभाग घेतला आहे. त्यांना आतापर्यंत व्याज, दंड, निर्लेखनासह भरलेल्या रकमेएवढीच एकूण 6 हजार 769 कोटी 50 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. या शेतकर्‍यांनी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रकमेमधील शिल्लक रक्कम येत्या 31 मार्चपर्यंत भरल्यास त्यांचीही उर्वरित 50 टक्के थकबाकी संपूर्ण माफ होणार आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत सुधारित थकबाकीची एकूण 50 टक्के रक्कम व चालू वीजबिल भरून राज्यातील 3 लाख 97 हजार 199 शेतकर्‍यांनी वीजबिल संपूर्णपणे कोरे केले आहे. त्यांना उर्वरित 50 टक्के थकबाकीची 571 कोटी 88 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.
कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीच्या योजनेत पुणे प्रादेशिक विभागामध्ये 7 लाख 27 हजार 637 शेतकरी सहभागी झाले असून त्यातील 2 लाख 9 हजार 638 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. कोकण प्रादेशिक विभागात सहभागी 6 लाख 19 हजार 285 पैकी 1 लाख 9 हजार 594 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहे. नागपूर प्रादेशिक विभागात 3 लाख 43 हजार 207 शेतकरी सहभागी झाले असून, 60 हजार 938 थकबाकीमुक्त तर औरंगाबाद प्रादेशिक विभागात सहभागी 4 लाख 89 हजार 687 पैकी 17 हजार 29 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.

शंकेचे निराकरण तातडीने करावे
ज्या शेतकर्‍यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करावे व या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकर्‍यांना करून देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. सुधारित थकबाकीमध्ये आणखी 50 टक्के माफी मिळविण्याची संधी येत्या 31 मार्चपर्यंत असल्याने थकबाकीदार शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.