चीन, युरोपमधून कमी पुरवठ्यामुळे जिल्ह्यासह राज्यात सीएनजी गॅसचा तुटवडा

रत्नागिरी:- जिल्ह्यासह राज्यात सीएनजी गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. चीन आणि युरोपमधूनच गॅसचा कमी पुरवठा होत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यात पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने अनेक वाहनधारकांनी गॅस किट बसविल्याने गॅसची अपेक्षापेक्षा जास्त मागणी वाढली आहे. तुटवड्यामुळे मागणी तेवढा पुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे आणखी काही महिने राज्यात सीएनजी गॅसची हिच परिस्थिती राहिल, असे मत येथील अशोका सीएनजी गॅसचे प्रमुख श्री. भारद्वाज यांनी दिली.  

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. सीएनजी वाहने खरेदी करण्यासाठी यापूर्वी कंपनीकडुन अनेक योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. तसेच त्याची मागणी वाढु लागल्याने अनेक ठिकाणी सीएनजी पंप उभारण्यात आले. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असून आता ११२ रुपये लिटर झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता पेट्रोलची वाहने चालविणे महागात पडु लागले आहे. सीएनजी गॅसचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे राज्यात सीएनजीच्या वाहनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारताला चीन आणि युरोपमधून सीएनजी गॅसचा पुरवठा होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या पुरवठ्यामध्ये २५ ते ३० टक्के कपात झाली आहे. जो गॅस उपलब्ध होतो, तोच सर्वत्र पुरविला जातो.

गॅसच्या माणगीपेक्षा पुरवठा कमी असल्याने त्याचे वितरण करताना कंपन्यांनी प्राधान्यक्रम ठरविला आहे. त्यानुसार वाहने आणि घरगुती वापरासाठी हा गॅस वितरित केला जात आहे. चीन आणि युरोपकडुन कमी पुरवठा होत असल्याने सीएनजीचा देशभरात तुटवडा असल्याचे कंपनीने सांगितले. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगाच्या रांगा लागत आहे.

रिक्षाचालकांनाही अडीच ते तीन तास रांगेत उभा रहावे लागत आहे. गॅसला अपेक्षित दाब नसल्याने त्याचा तोटा वाहनधारकांना बसत आहे. त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे, हे जाणून घेतल्यानंतर श्री. भारद्वाज यांनी ही माहिती दिली. पुढील काही महिने गॅसची ही समस्या कामय राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.