पॅनकार्ड योजनेत गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याच्या रागातून एजंटला मारहाण 

मंडणगड:- पॅनकार्डच्या योजनेत गुंतवण्यासाठी दिलेले 25 हजार रुपये परत केले नाहीत म्हणून एजंटला चार जणांनी मारहाण केल्याचा प्रकार मंडणगड शेनाळे गावठाण येथे घडला आहे. नितीन सिताराम जाधव (41, शेनाळे गावठाण, मंडणगड), सरस्वती सिताराम जाधव (70) अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी रात्री 9.15 वा. च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन जाधव हा 7 वर्षापूर्वी पॅनकार्ड योजनेचे काम करत होता. त्यावेळी शेजारी राहणार्‍या रमाकांत विठोबा जाधव (45) यांनी नितीन त्याच्याकडे पॅनकार्ड योजनेत पैसे गुंतवण्यासाठी 25 हजार रुपये दिले होते. ही रक्कम नितीन याने वरिष्ठ अधिकारी निलेश रक्ते, परेश वणे, सागर जाधव यांच्याकडे गुंतवण्यासाठी दिली होती. तीन वर्षानंतर ती रक्कम 35 हजार रुपये झाली होती. ती मिळावी म्हणून वारंवार रमाकांत मागणी करत होते. 

10 फेब्रुवारी रोजी नितीन व त्यांची आई सरस्वती रात्री 9.15 वा. रस्त्याने घरी जात असताना रमाकांत, त्यांची पत्नी, मुलगा, आई यांनी त्यांना आडवले व म्हणाले आम्हाला आमचे 35 हजार रुपये व त्यावर झालेले व्याज असे एकूण 50 हजार रूपये परत दे. त्यांना शिवीगाळ करु लागले म्हणून नितीन आईला घेवून घरी गेले असता दरवाजा तोडून रमाकांत, त्यांची पत्नी, मुलगा यांनी दोघांनाही काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिलीस तर संपवून  टाकू अशी धमकी दिली. 

नितीन यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार रमाकांत जाधव, पत्नी सुवर्णा जाधव, मुलगा विराज जाधव, आई रुक्मीणी जाधव यांच्यावर भादविकलम 452, 324, 323, 504, 506, 427, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.