डंपर अंगावरुन गेल्याने चिपळूण येथे विद्यार्थिनीचा मृत्यू

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरुन दळवटणे येथे महाविद्यालयातील फी चे पैसे आणण्यासाठी दुचाकीवरुन जाताना डंपरने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून दोन्ही विद्यार्थिनी खाली कोसळल्या आणि मागे बसलेल्या श्रुती शिर्के हिच्या अंगावरून डंपर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

श्रृती संतोष शिर्के (18, मूळ भोम, सध्या बेंदकरआळी, चिपळूण) व जान्हवी एकनाथ जाधव (19, दळवटणे-नलावडे)  या दोघी सकाळी कॉलेजमध्ये गेल्या होत्या. या दोघीही 13 वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहेत. मात्र कॉलेजमध्ये भरण्यासाठी जान्हवी हीची फी राहिल्याने त्या दोघी दळवटणे येथे जात असताना पर्शुरामकडे  जाणार्‍या डंपरने मागून धडक दिली. यात दोघीही रस्त्यावर पडल्या. दुचाकीच्या मागे बसलेल्या श्रृतीच्या छातीवरुन डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर जान्हवी ही जखमी असून तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.