ई- पीक पाहणीसाठी मुदतवाढ मिळावी; शेतकऱ्यांची मागणी

रत्नागिरी:- नव्या तंत्रानुसार ई- पीक पाहणी करणार्‍या शेतकर्‍यांना आपत्ती काळात नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारी रोजी ई-पीक पाहणीची मुदत संपली असून अद्याप जिल्ह्यात 60 ते 70 टक्के ई- पीक पाहणी पूर्ण झाली आहे. उर्वरित क्षेत्राची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास त्यांना भरपाई देणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीची मुदत वाढवावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी नोंदविली आहे.

15 ऑगस्ट 2021 पासून खरीप हंगामात ई-पीक पाहणी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत खरीप हंगामात कोकणातील सुमारे 70 टक्के शेतकर्‍यांनी पिकांची अचूक नोंद केली. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास ते शेतकरी लाभधारक ठरले. यासाठी अंतिम  मुदत 15 फेब्रुवारी होती.

पिकांची नोंद करण्याचे आवाहन कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले होते. ई पीक पाहणी या अ‍ॅपच्या  माध्यमातून शेतकर्‍यांना करावी लागणार आहे. पीक नोंदीसाठी तलाठ्याची वाट न पाहता शेतकर्‍यांना सातबारा उतारावर पिकांची ऑनलाईन नोंद करता येणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले तरी या माध्यमातून नुकसानभरपाई मिळू शकणार आहे.

याआधी पीक नोंदणीसाठीची मुदत देखील वाढविण्यात आली होती. ही मुदत 15 फेब्रुवारी आहे. मात्र अद्यापही तीस टक्के क्षेत्र पीक पाहणीत वंचित आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणीही असल्याने काही भागातील पीक पाहणी रखडल्या. त्यामुळे यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे केली आहे.

माहिती कक्ष सुरू करावा
 ई पीक पाहणी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र या योजनेबाबत कोकणातील शेतकरी अद्याप अनभिज्ञ  आहे. यासाठी या योजनेची माहिती सामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी योजनांचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी कार्यालयात ई-पीक पाहणी माहितीचा कक्ष सुरू करावा, अशी मागणी कृषी विभागाकडे करण्यात आली आहे.