रत्नागिरी, सिंधुदुर्गातील पाच पेट्रोल पंपांवर कारवाई; मापात पाप भोवले

रत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच पेट्रोल पंपांमध्ये मापात पाप केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. प्रत्येक पाच लिटरमध्ये २५ मिली कमी पेट्रोल भरल्याने सहाय्यक नियंत्रणक वैध मापन शास्त्र विभागाने ही कारवाई केली आहे. संबंधित पंप चालकांना त्यामध्ये सुधारणा करून आपला परवाना नूतनीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या विभागाच्या मुख्यालयातील पथकाने केलेल्या तपासणीत हे पुढे आले आहे. अशा प्रकारे कधीही अचानक तपासणी होण्याची शक्यता असल्याने पेट्रोल पंपधारकांमध्ये या पथकाची चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.

सहाय्यक नियंत्रणक वैध मापनशास्त्र विभागामार्फत व्यापारात असणारे वजन काट्यांचे, तराजू, इलेक्ट्रॉनिक काटे, मापन आदीचे वर्षाला नूतनीकरण करून घेतले जाते. या उपकरणांची या विभागाकडून तपासणी होते. शासनाने त्या उपकरणाच्या आधारावर शुल्क आकारले आहे. ते शुल्क भरल्यानंतर त्याचे नूतनीकरण केले जाते. त्यामध्ये पेट्रोल पंपांचाही समावेश आहे. पेट्रोल पंपातील फ्युएल नोजलचा (पेट्रोल भरण्याचे उपकरण) परवाना घेतला जातो. प्रत्येक फ्युएल नोजलला वर्षाला नुतणीकरणासाठी ५ हजार रुपये शुल्क भरावे लागते. सहाय्यक नियंत्रणक वैध मापन शास्त्र विभागाकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पेट्रोल पंपांची तपासणी केली जाते. दरम्यान, परवाना नूतनीकरण करण्यास १ ते ३ महिने उशीर झाला तर त्यांना अडीच हजार जादा शुल्क आकारले जाते.

नोव्हेंबर २०२१ मध्ये वैध मापन शास्त्र विभागाच्या मुख्यालयातील पथकाने दोन्ही जिल्ह्यातील पेट्रोल पंपांची तपासणी केली. त्यामध्ये तळेरे, झाराप, वेंगुर्ले आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांची तपासणी केली. काही फ्युएल नोजलमधुन ५ लिटर पेट्रोल घेण्यात आले. त्यामध्ये वरील पाच पंपांमध्ये काही मिली पेट्रोल कमी आढळून आले. वैध मापन शास्त्र विभागाच्या नियमानुसार २५ मिली पेक्षा कमी पेट्रोल आढळल्यास कारवाई केली जाते. त्यानुसार वरील दोन्ही जिल्ह्यातील ५ पेट्रोल पंपांना नोटीस बजावली आहे. लवकरात लवकर यामध्ये सुधारणा करून फ्युल नोजलचे नूतनीकरण करून घेण्याचे आदेश दिले आहेत.