राजापूर:- राजापूर तालुक्यातील केळवडे येथे जंगलात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व सिंधुदुर्ग येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव (४५) या प्रौढाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्गहून रत्नागिरीत उपचारार्थ हलविण्यात येत असताना शनिवारी उपचारापुर्वीच मृत्यु झाला आहे. वैद्यकीय तपासणी दरम्यान दिपक यांच्या डोक्यात बंदुकीचे छरे आढळून आल्याने त्याचा घातपाताने मृत्यु झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या प्रकरणी प्रथमदर्शनी पाहणाऱ्या पार्वती गंगाराम हर्याण (रा. केळवडे) यांच्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी अज्ञाताविरोधात भा.द.वी. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली आहे. दिपक गुरव हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे बागेत गुरे चारण्यासाठी गेले होते. दरम्यान सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पार्वती हर्याण या ठिकाणावरून जात असताना त्यांना दिपक हे रक्ताच्या थारोळयात पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ गावात येत ही माहिती दिली. यानंतर त्यांना राजापूरातील खासगी रूग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यान अधिक उपचारासाठी त्यांना सिंधुदुर्गातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी दिपक यांची वैद्यकिय तपासणी केली असता त्यांच्या डोक्याला झालेली गंभीर जखम ही बंदुकीचे छरे लागून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर याबाबत सिंधुदुर्ग पोलीसांना माहिती देण्यात आली. याबाबत सिंधुदुर्ग पोलीसांकडून राजापूर पोलीसांना कळविण्यात आले.
त्यानंतर पोलीस निरीक्षक परबकर यांनी तात्काळ केळवडे गावात घटनास्थळी जाऊन पहाणी केले. यानंतर राजापूर पोलीसांनी दिपक यांना जंगलात प्रथम प्रत्यक्षदर्शी पहाणाऱ्या पार्वती हर्याण यांची फिर्याद दाखल करून घेतली आहे. दिपक याला बंदूकीची गोळी लागून गंभीर जखमी झाल्याचे वैद्यकिय तपासणीत निष्पन्न झाल्याने या प्रकरणी पोलीसांनी शुक्रवारी रात्री उशीरा अज्ञाताविरोधात भा. द. वि. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती परबकर यांनी दिली आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दिपक याची प्रकृती गंभीर होती, ते बेशुध्द अवस्थेतच होते. शनिवारी त्यांना सिंधुदुर्गातुन पुढील उपचारासाठी रत्नागिरी आणण्यात आले. मात्र रत्नागिरीत रूग्णालयात उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला आहे. या एकूणच घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून दिपक यांच्या मृत्युमागे घातपात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यामागे गावातील वादांची पार्श्वभूमी असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर हे अधिक तपास करत असून प्रारंभी फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता दिपक यांचा मृत्यु झाल्याने नव्याने भा. द. वि. कलम ३०२ लावले जाणार असल्याचे परबकर यांनी सांगितले. या प्रकरणी सर्व बाजुने तपास सुरू असून लवकरच सत्य बाहेर येईल असेही परबकर यांनी सांगितले.