मुंबई-गोवा महामार्गावर कार- दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू, एक गंभीर

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर नेरकेवाडी येथे कोळेकर फार्म हाऊस समोर मारूती कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला.

सौ. सविता सखाराम पुजारी (रा. नेरकेवाडी) असे या मृत महिलेचे नाव आहे. तर या अपघातात तीचा मुलगा सुहास सखाराम पुजारी (२५) हा गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी सुहास हा आपल्या दुचाकी (क्र. एम. एच. ०८,ए. व्ही. ८६९७) वरून आई सौ. सविता हिला घेवून नेरकेवाडी कडून राजापूरकडे येत होता. तो नेरकेवाडी येथील कोळेकर फार्म जवळ आला असता याच दरम्यान मुंबईकडून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या मारूती सुझीकी अल्टो कार (क्र. एम. ०६, ए. एस. ७६२९) च्या चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सुहास व त्याची आई गंभीर जखमी झाली. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर जगद्गुरू महाराज संस्थानेच्या रूग्णवाहिकेचे चालक समीर हळदणकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत त्यांना रूग्णवाहिकेने राजापूर ग्रामिण रूग्णालयात दाखल केले.

मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते भास्कर कुवळेकर यांनी आपल्या रूग्ण्वाहिकेतून त्यांना रत्नागिरी येथे हलविले. जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सौ. सविता या मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर सुहास याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. दरम्यान या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेत राजापूर पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.