आंगणेवाडी यात्रेसाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे धावणार

रत्नागिरी:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेकरिता मुंबईतून येणार्‍या प्रवाशांकरिता कोकण रेल्वेमार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. याशिवाय दादर-सावंतवाडी मार्गावर होळीसाठी एक गाडी सोडण्यात येणार आहे.

आंगणेवाडीसाठी सोडण्यात येणार्‍या गाड्यांमध्ये २३ फेब्रुवारीला एलटीटीहून रात्री पावणेबारा वाजता एक गाडी सुटेल. ती २४ फेब्रुवारीला ती सावंतवाडीला सकाळी १० वाजता पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास सावंतवाडीहून त्याच दिवशी सकाळी ११ वाजता सुरु होईल. ती गाडी त्याच रात्री ११ वाजता एलटीटीईला पोहोचेल. गाडीला प्रथम एसी १, टू टायर एसी १, थ्री टायर एसी ५, द्वितीय श्रेणी शयनयान ११ आणि बसण्याकरिता ३ डब्यांसह एकूण २३ डबे असतील.
दुसरी गाडी दादर-सावंतवाडी मार्गावर १६ आणि १९ मार्चला सोडण्यात येणार आहे. ही गाडी दादर येथून दुपारी १२ वाजून सुटेल आणि रात्री ११ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास सावंतवाडीहून १६ आणि १९ मार्चला रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुरु होईल. ती गाडी दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी दादरला पोहोचेल. या गाडीला टू टायर एसी १, थ्री टायर ओसी २, द्वितीय श्रेणी शयनयान ७, बसण्याकरिता ५ डब्यांसह एकून १७ डबे असतील. या दोन्ही गाड्या जाताना आणि येताना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबणार आहेत. या दोन्ही गाड्यांचे आरक्षण 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

मडगाव-सावंतवाडी गाडी रद्द

मध्य रेल्वे मार्गावर ५ आणि ६ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक घेण्यात आला असून त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. त्यात आणखी भर पडली असून मडगाव-सावंतवाडी ही गाडी ४ ते ८ फेब्रुवारीपर्यंत रद्द केली आहे.