तालुक्यातील ग्रामपंचायती कृषी समित्यांविना 

पंचायत समितीच्या बैठकीत माहिती समोर

रत्नागिरी:- तालुक्यातील काही ग्रामपंचातींमध्ये कृषी समित्या अद्यापही स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत पंचायत समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. येत्या महिन्याभरात या समित्या स्थापन करण्यात येतील, असे आश्‍वासन ग्रामपंचायत व समाजकल्याण विभागाकडून देण्यात आले.

पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी श्यामराव पेजे सभागृहात झाली. यावेळी सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, जेष्ठ सदस्य आबा पाटील, सुनील नावले, साक्षी रावणंग, सर्व सदस्य आणि गटविकास अधिकारी तुकाराम जाधव उपस्थित होते. यावेळी सदस्य आबा पाटील यांनी काही ग्रामपंचायतींमध्ये कृषी समित्या स्थापन झाल्या नसल्याने ग्रामपंचायत विभागाला धारेवर धरले.  या समित्यांच्या अध्यक्षपदी सरपंच आणि सचिवपदी ग्रामसेवकांची नियुक्ती करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, ग्रामसेवकांकडून याबाबत सकारात्म प्रतिसाद मिळत नसल्याने या समित्या अद्यापही स्थापन झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत विभागाकडून नुकत्याच झालेल्या ग्रामसेवकांच्या बैठकीत याबाबत सूचना देण्यात आल्या असून, सर्व ग्रामपंचयातींमध्ये येत्या महिन्याभरात समित्या स्थापन करण्यात येतील, असे सांगण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतून तालुक्याला 91 सौरपथदिवे मंजूर झाले आहेत. हे पथदिवे 17 ग्रामपंचायतींमध्ये बसवण्यात येणार आहेत. तालुक्यात आतापर्यंत घरपट्टीची 74.6 टक्के आणि पाणीपट्टीची 71.6 टक्के वसुली झाल्याची माहितीही ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून नवीन नळपाणी योजनांसाठी गावात टाक्या उभारण्यासाठी जागा मिळत नाहीत. उपलब्ध जागांचे बक्षीसपत्र होण्यात उशीर होत असल्याने या योजना राबवण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.
तालुक्याला नियमित गटशिक्षणाधिकारी नसल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. शालेय पोषण आहाराचा प्रश्‍नही प्रलंबित आहे. त्यामुळे नियमिक गटशिक्षणाधिकारी मिळावा, अशी मागणीही सदस्यांनी केली.