रत्नागिरीत काकाने मारला पुतणीच्या लॉकरमधील 9 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

रत्नागिरी:- संयुक्तरित्या बँकेत घेतलेल्या लॉकरमध्ये ठेवलेले मंदिरातील सुमारे नऊ लाख रुपये किमतीचे दागिने काढून परस्पर विक्री करणाऱ्या वृद्ध काका विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुतणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी श्रीधर विठ्ठल भावे (रा. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धनश्री अमर अभ्यंकर यांनी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार धनश्री अभ्यंकर यांचे काका श्रीधर भावे या दोघांनी मंदिरातील दागिने रत्नागिरीतील शिवाजीनगर येथील जनता सहकारी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते . दि.१८ फेब्रुवारी २०१२ ला हे दागिने ठेवण्यात आले, परंतु दि.१६ मार्च २०१५ ते दि. ३१जानेवारी २०२२ यामुळे मुदतीमध्ये काका श्रीधर भावे यांनी धनश्री अभ्यंकर यांना कोणतीही कल्पना न देता लॉकरमधील सुमारे नऊ लाख रुपये किमतीचे दागिने काढून त्याची परस्पर विक्रि केली.

मंदिरातील दागिने बँकेत असल्याने निर्धास्त असलेल्या धनश्री अभ्यंकर यांनी रत्नागिरीत आल्यानंतर लॉकर बाबत चौकशी केल्यानंतर त्यांना दागिने काका श्रीधर भावे यांनी बाहेर काढण्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत काकांना विचारल्यानंतर काकांनी दागिने काढून त्याची विक्री केल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे धनश्री अभ्यंकर यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी दि.१ फेब्रुवारीङ रोजी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात काका श्रीधर विठ्ठल भावे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.