युएनडीपीच्या प्रकल्पासाठी 15 गावांची निवड

कांदळवन कक्ष; किनारी भागातील लोकांना रोजगार

रत्नागिरी:- कांदळवनाचे महत्व पटवून देणे आणि कांदळवनातून उपजिवीका निर्माण करून गावातील महिला व युवकांना स्वयंरोजगार योजना विषयी प्रशिक्षण देणे, क्षमता बांधणी करणे आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यासाठी समुद्र किनारी गावात राबविण्यात येणार्‍या युएनडीपीच्या प्रकल्पासाठी 15 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ग्रामस्थांना प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी उद्युक्त करण्यात येत आहे.

हा प्रकल्प राबविण्यासाठी कांदळवन कक्षाचे प्रमुख अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, उपवनसंरक्षक कांदळवन कक्ष मुंबई श्रीमती नीनू सोमराज, विभागीय वनअधिकारी दिपक खाडे यांचे मार्गदर्शन आहे. कांदळवन कक्षाचे अधिकारी राजेंद्र पाटील हे हा प्रकल्प राबविण्यासाठी तळागाळात जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. युएनडीपीच्या अर्थ साहाय्यातून हा प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यातील उटंबर, उंबरशेत, सालदुरे, केळशी आणि गुहागर तालुक्यातील भातगाव, भातगाव धक्का, कुडली व भातगाव तिसंग, रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ, आरे, मिर्‍या, शिरगाव. राजापूर तालुक्यातील माडबन, मिठगावणे, सागवे-घोडेपोई या गावांची निवड करण्यात आली आहे. त्या गावांमध्ये शोभिवंत मत्स्यपालन, पिजंर्‍यातील मत्स्यपालन, कालवेपालन व खेकडापालन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे मर्यादित स्वरूपात सर्व नियमांचे पालन करून काम सूरू आहे.

दरम्यान, निसर्ग पर्यटनकरीता सोनगावसाठी (खेड) बारा लाख रुपये, गावखडी (रत्नागिरी) आणि आंजर्लेे (दापोली) साठी प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर आहेत. आंजर्लेत कयाक बोटींग, मरीन वॉक, संगमेश्वरात कांदळवन सफारी, पक्षी निरिक्षण, तारे निरिक्षण या सुविधा प्रस्तावित असून यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण गटांना देण्यात आले आहे. सोनगाव येथे निसर्ग पर्यटन क्रोकोडाईल सफारी, कांदळवन सफारी पक्षी निरिक्षण या सुविधी प्रस्तावित असून यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण गटांना देण्यात आले आहे. गावखडी येथे कासव संवर्धन विषयक जनजागृती आणि माहिती फलक बनविण्यात येणार आहेत. आर्थिक वर्षात नवीन गावे निश्‍चित केली असून त्यात नाचणे, सांडे लावगण, सोमेश्वर, चिंचखरी, दाभिळ आंबेरे, डोर्लें, वेसवी, शिपोळे, उमरोली, मुरुड ही प्रस्तावित आहेत.