महिन्यानंतरही पर्ससीन मच्छिमारांचे आंदोलन सुरुच 

रत्नागिरी:- महिना होत आला तरी पर्ससीन नेट मच्छिमारांच्या आंदोलनाचा इरादा अजूनही डळमळीत झालेला नाही. थंडी, वार्‍याची पर्वा न करता 3 जानेवारीपासून सुरू झालेले आंदोलन अद्याप सुरूच आहे. आंदोलनस्थळी घेतलेला वीज पुरवठा खंडित झाला तरीही साखळी उपोषण करणार्‍या आंदोलकांचे मनोधैर्य खचलेले नाही. दोनच दिवसात आंदोलनस्थळी तात्पुरत्या स्वरुपात वीज पुरवठा जोडून घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमात राज्य शासनाने सुधारणा केली. सुधारित कायद्यानुसार 1 जानेवारीपासून पर्ससीन नेट मच्छिमार नौकाना केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील म्हणजे 12 नॉटिकल मैलबाहेर समुद्रात मासेमारी करण्यास जाता येत नाही. राज्याच्या अखत्यारितील समुद्रातून मासेमारी करण्यासाठी जाणार्‍या नौकाना मार्गीकाच दिली जात नाही. इतकेच नव्हे तर राज्याच्या मासळी उतरवण्याच्या बंदरांचाही वापर करू दिला जात नाही. राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांकडून कारवाई केली जात आहे आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांसमोरच चालत आहे. त्यामुळे जाचक कायद्यांना विरोध म्हणून पर्ससीन मच्छिमार 3 जानेवारीपासून उपोषणास बसले आहेत.

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण केले जात आहे. याठिकाणी उभारलेल्या मंडपात बेकायदेशीरपणे वीज पुरवठा जोडून घेण्यात आला असल्याचे पारंपरिक मच्छिमारांकडून उघड करण्यात आले. त्यावेळी हा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला होता. ज्या ठिकाणी आंदोलन मंडप आहे तेथे झाडी असून मच्छर मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर समुद्र जवळ असल्याने वारा आणि थंडीही जोरदार असते. अशावेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांचे मनोधैर्य खचण्याची शक्यता होती. परंतु अवघ्या दोन दिवसात अधिकृतपणे तात्पुरता वीज पुरवठा जोडून घेण्यात आला असून साखळी उपोषण सुरूच आहे.