खाजगी टेम्पो-रिक्षातून प्रवासास पोलिसांचा मज्जाव

महिलांमध्ये नाराजी; समविचारी मंच आवाज उठवणार

रत्नागिरी:- एसटी बंद असल्यामुळे श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आजूबाजूच्या परिसरातील असंख्य महिला स्थानिक उद्योगधंद्यामध्ये रोजगारासाठी येतात. त्यांचा उदर निर्वाह यावरच अवलंबून असतो. एसटी नसल्यामुळे त्यांना खाजगी टेम्पो-रिक्षा या वाहनांचा आधार असतो. मात्र गणपतीपुळे येथील स्थानिक पोलिस प्रशासनाने या प्रवासी वाहतूकीला मज्जाव केला असून हातावर पोट असणार्‍या या महिलांना लांबवरुन यायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात एसटी संप विचारात घेऊन खाजगी वाहतूकीला प्राधान्य दिले जात असताना केवळ श्रमिक महिलांबाबत हा अन्याय का म्हणून या श्रमिक महिलांनी महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, निलेश आखाडे,मनोहर गुरव आदी पदाधिका-यांकडे आपली कैफीयत मांडली.

विशेष म्हणजे एसटी संप म्हणून येथील स्थानिक वाहनधारक व्यवसायिक  दृष्टिकोन न बाळगता अवघ्या दहा रुपयात या महिलांना वाहनसेवा उपलब्ध करुन देतात तरीही मागील आठवडाभर  येथील महिला पोलिस अधिकारी या वाहतूकीला बंदी घालून कामावर येणार्‍या महिलांना मज्जाव करीत असल्याने या परिसरातील महिलांना कामावर यायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत समविचारीचे पदाधिकारी जिल्हा पोलिस अधिक्षक यांची भेट घेऊन याबाबतीत लक्ष घालणार असल्याचे सांगण्यात आले आहे.हातावर पोट असणार्‍या आणि मोलमजूरी करणार्‍या महिलांना होणारा हा अकारण त्रास न थांबविल्यास सनदशील मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेने दिला असून संबंधित महिलांनी संभाव्य लढ्याला पाठिंबा दिला आहे.