राजापूरातील कोर्टात आरोपीचा धिंगाणा; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत साहित्याची तोडफोड  

राजापूर:- नाटे पोलिसानी हजर केलेल्या संशयित आरोपीने कोर्टात धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. संशयित आरोपीला राजापूर दिवाणी न्यायालयात सुनावणीसाठी नेल्यानंतर आरोपीने कोर्टात गोंधळ घातला. आरोपीच्या या आक्रस्ताळेपणाने कोर्टात एकच गोंधळ उडाला. 
 

संजय सखाराम बाणे (45, रा. कुंभवडे, वावूळवाडी) असे त्याचे नाव आहे. कोर्टात आल्यावर त्याने मोठमोठ्याने आरडा ओरड करायला सुरुवात केली. ‘माझे कोण वाकडे करतो’ अशा अर्वाच्च भाषा वापरायला लागला. न्यायालयातील चौकशी कक्षाच्या काचेवर हात मारून त्याने काच तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला समजावण्यासाठी न्यायालयातील कर्मचारी गेले असता त्याने कर्मचाऱ्यांना ढकलून दिले व न्यायाधिश कक्षाचे बाहेर धावत सुटला. त्यानंतर त्याला पकडून सरकारी वकील कक्षात आणण्यात आले. मात्र तेथेही तो शांत बसला नाही. संगणकाची वायर हाताने ओढून संगणक उपकरणाची नासधूस केली. याप्रकरणी राजापूर दिवाणी न्यायालयातील कर्मचारी रविकांत शांताराम कदम यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल दिली. त्यानुसार शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संजय बाणे याच्या विरोधात भादवी कलम 353, 427, महाराष्ट्र पोलीस अधि.1951 चे कलम 110/117 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.