जिल्ह्यातील 89 अंगणवाड्या बनल्या आनंदवाड्या

रत्नागिरी:- जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाने गावागावातील अंगणवाड्या स्मार्ट बनविण्यासाठी पावले उचलली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८९ अंगणवाड्या आनंदवाड्या बनल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जाणारे विद्यार्थी पुन्हा मराठी शाळेत यावेत, यासाठी हे पाऊल उपयुक्त ठरणार आहे.

आनंदवाड्यांमध्ये जुन्या अंगणवाड्यांची नुसतीच रंगरंगोटी करण्याऐवजी मुलांना अंगणवाडीत यावेस वाटावे आणि पालकांचीही मानसिकता व्हावी यादृष्टीने चेहरामोहरा बदलण्यात येत आहे. याअंतर्गत एलईडी टीव्ही, सोलर लाइटीग सिस्टीम, ई-लर्निंग सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हँडवॉश बेसिन, एज्युकेशनल पेंटिंग चार्टस आदी साहित्य दिले जात आहे. तसेच अंगणवाडी केंद्राची किरकोळ डागडुजी व दुरुस्ती देखील करण्यात आली आहे. पाल्य चांगल्या शाळेत शिकावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे गावागावातील पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे असतो. शहरी भागातील पालकांबरोबरच ग्रामीण भागातील पालकही हळूहळू प्ले स्कुल, नर्सरीकडे पाल्याला नेत आहेत. अंगणवाडीतील मुलांना हसत-खेळत शिक्षण मिळावे, बागडता यावे, खेळातून अभ्यास व्हावा, यासाठी बोलक्या अंगणवाड्या तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात प्रायोगिक टप्प्यात 89 अंगणवाड्या स्मार्ट बनल्या आहेत. मुलांना सण सांगणे, पाळीव प्राण्यांची ओळख करून देणे, फुलांची ओळख करून देण्यासाठी शाळांमध्ये रंगरंगोटी करून घेतली आहे. टीव्ही, डीव्हीडीचा वापर काही शाळांमध्ये लोकसहभागातून टीव्ही व डीव्हीडी दिले आहेत. टीव्हीमध्ये गाणी-गोष्टी पाहून शिकता यावे, यासाठी त्याचा उपयोग होत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जशा सोयीसुविधा असतात, तशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे चित्र बदलले आहे. जिल्हा परिषद शाळांच्या घटत्या पटसंख्येला ही पूरक बाब ठरु शकते.