एसटी कर्मचारी बंदला जिल्ह्यात 82 दिवस पूर्ण

कामगार अजूनही ठाम ; सोमवारी निर्णयाची शक्यता

रत्नागिरी:- शासनात विलीनीकरण करा या एकाच मागणीसाठी एसटी कामगारांनी संप सुरू केला. या संपाला आता ८० दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही संप मिटण्याची शक्यता दिसत नाही. येत्या ३१ जानेवारीला १२ आठवड्यांची मुदत समाप्त होत असल्याने या दिवशी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर समिती निर्णय देणार का याकडे साऱ्या कामगारांचे लक्ष लागून राहिले आहे. तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.

दरम्यान आज आंदोलनकर्त्यांची भेट घेतली असता त्यांनी आम्ही संपावर ठाम आहोत. तसेच न्यायालयाने १२ आठवड्यांची दिलेली मुदत संपत असल्याने तोपर्यंत आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत. शासनाने विलीनीकरणाच्या बाबतीत निर्णय देणे अपेक्षित होते. ही मुदत संपताना तरी निर्णय होईल, आणि निर्णय आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास कामगारांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात सर्वत्र कामगार संपावर आहेत. त्यामुळे एसटी आगार ठप्प आहेत. काही ठरावीक ठिकाणीच वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. जिल्ह्यात वाहतूक हळुहळू होत आहे. आज प्रशासकीय २४५, कार्यशाळा १८६, चालक ८१, वाहक ६६ आणि चालक तथा वाहक ६१ असे ६५१ कर्मचारी कामावर हजर होते. १३ कर्मचारी गैरहजर होते आणि १७३ कर्मचारी साप्ताहिक सुट्टी, दौरा, अधिकृत रजेवर होते. प्रत्यक्ष संपामध्ये २७१९ कर्मचारी आहेत.

२९ हजार प्रवाशांची वाहतूक

२७ जानेवारी पर्यंत जिल्ह्यात २९ हजार २०७ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. यामध्ये दापोली ५९१४, खेड ३३४२, चिपळूण ६६५७, गुहागर ००, देवरुख ८११२, रत्नागिरी १०७०, लांजा ५७३, राजापूर ३१४६ आणि मंडणगड ३९३ प्रवाशांचा समावेश आहे. ही वाहतूक वाढण्याकरिता अधिकारी प्रयत्नात आहेत. चालक, वाहकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.