जिल्हा परिषदेच्या ताफ्यात पाच नव्या कोऱ्या गाड्या 

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या निधीमधून पाच नवीन गाड्यांची खरेदी करण्यात आली असून त्या तीन सभापती आणि दोन गटविकास अधिकार्‍यांना प्रदान करण्यात आल्या आहेत. गाड्यांच्या खरेदीसाठी शासनाकडून मान्यता मिळावी यासाठी अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने यांनी विशेष प्रयत्न केले होते.


वाहनांअभावी विकासकामांची पाहणी करण्यासह प्रशासकीय दौर्‍यांमध्ये पदाधिकारी आणि अधिकार्‍यांना अडचणी येतात. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्यासाठीची गाडी खुपच जूनी झालेली होती. ती वारंवार बंद पडत असल्यामुळे अनेकवेळा कदम यांना दौरा सोडून माघारी परतावे लागत होते. गटविकास अधिकार्‍यांचीही तीच परिस्थिती होत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी विशेष बाब म्हणून याला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांना उपाध्यक्ष बने यांचीही साथ होती. काही दिवसांपुर्वी वाहने खरेदी करण्यासाठी परवानगी मिळाली; मात्र निधी कमी असल्यामुळे कोणते वाहन खरेदी करायचे हा प्रश्‍न होता. त्यावरही मात करण्यात आली असून नवीन पाच चारचाकी गाड्या पदाधिकारी, अधिकार्‍यांसाठी प्राप्त झाल्या आहेत. त्याचा शुभारंभ मंगळवारी (ता. 25) सकाळी अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष बने, समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. या गाड्या दोन पंचायत समिती सभापती आणि चिपळूण, खेडचे गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय इमारतीचे भुमीपुजन लवकरच

वाहने नसल्यामुळे होणारी गैरसोय आता कमी झाली आहे. लवकरच जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले.