जि. प. च्या 95 टक्के शाळा व्यवस्थापन समित्यांचा अध्यापन सुरू करण्यास कौल 

पालकमंत्री-जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे नजरा

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या 2 हजार 522 शाळांपैकी 95 टक्के शाळा व्यवस्थापन समित्यांनी प्रत्यक्ष अध्यापन सुरु करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील काही जिल्ह्यातील शाळांमधील किलबिलाट सुरु झाला असला तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना अजूनही विद्यार्थ्यांची प्रतिक्षाच आहे. जिल्ह्यात कोरोनाचे दिवसाला दोनशे हून अधिक बाधित सापडत आहे. रविवारी कमी बाधित सापडल्याने दिलासा मिळाला होता. शाळांमधील प्रत्यक्ष अध्यापन सुरु करण्यास पालकांकडून मागणी होत आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागातील अनेक जिल्हापरिषद शाळांची पटसंख्या अत्यंत कमी आहे. गावांमध्ये बाधित सापडण्याचे प्रमाण कमी आहे. हे लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समितींनी बैठक घेऊन शाळा चालू कराव्या की नको याबाबत चर्चा करण्यास सांगितले होते. त्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसात गावागावामध्ये बैठका झाल्या. आतापर्यंत 2 हजार 522 शाळांमधील चोविसशेहून अधिक शाळांनी संमती दिली आहे. शाळास्तरावरुन आलेल्या निर्णयाची माहिती 26 जानेवारीला रत्नागिरी दौर्‍यावर येणारे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्यापुढे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पालकमंत्र्यांशी चर्चा करुन शाळा चालू करण्याबाबतचा निर्णय घेतील असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. अधिक पट असलेल्या शाळांमध्ये गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करण्यात येते. मागील वेळी एक दिवस मुले आणि एक दिवस मुलींना शाळेत बोलावले जाते. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझिंग यावर भर दिला जात असल्याने मुले सुरक्षित राहतात. गावात कोरोना बाधित वाढले तर त्या परिसरातील शाळा बंद ठेवल्या जातात. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्‍न उद्भवत नसल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे.