शाळा सुरू करण्याबाबत सावध भूमिका; सव्वा दोन लाख विद्यार्थी प्रतीक्षेत 

रत्नागिरी:- जिल्ह्यात दररोज दोनशेहून अधिक कोरोना बाधित सापडत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून माध्यमिक, प्राथमिक शाळा चालू करण्याबाबत सावध भुमिका घेतली आहे. त्यामुळे पहिली ते बारावीच्या सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांची प्रतिक्षाच करावी लागणार आहे. प्रत्यक्ष अध्यापनाचा निर्णय चार दिवसांनी होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शाळेची घंटा पून्हा वाजेल अशी शक्यता आहे.

कोरोनातील परिस्थितीमुळे दीड वर्ष शाळा बंदच होत्या. पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थी ऑनलाईन अध्ययन करत होते. पहिल्या लाटेचे प्रमाण कमी झाल्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास टप्प्या-टप्प्याने परवानगी देण्यात आली. कोरोनामुळे सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा रद्द कराव्या लागल्या. गतवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाद्वारे उत्तीर्ण करण्यात आले. ओमायक्रॉनचे बाधित सापडू लागल्यामुळे दोन महिन्यात पुन्हा शाळा, महाविद्यालये बंद झाल्या. गेल्या चार दिवसात मुंबईतील बाधितांची संख्या घटू लागली आहे. त्यानंतर शासनाने शाळा सुरु करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपवली. त्यामुळे सर्वच विद्यार्थी, पालक आनंदीत झाले होते. पण जिल्ह्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने लांबणीवर टाकल्याने अनेकांचा हिरेमोड झाला. पहिलीपासून बारावीपर्यंत जिल्ह्यात ३ हजार १५१ शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात दररोज दोनशेहून अधिक बाधित सापडत आहेत. लहान मुले एकमेकांच्या संपर्कात आल्यास प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दोनच दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांशी जिल्हाधिकार्‍यांनी चर्चा केली. त्यानंतर २६ जानेवारीनंतर पालकमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्याचे निश्‍चित केल आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोना बाधितांची संख्या अधिक असल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शाळा चालू केल्या जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही या पध्दतीने निर्णय होण्याची शक्यता आहे.