दापोली वणौशी तिहेरी हत्याकांड उघडकीस; एका संशयिताला बेडया

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांची एकाच वेळी हत्या करणाऱ्या एकाला दापोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केवळ आठ दिवसांत या खूनाचा छडा लावत दापोली पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे. तीन महिलांच्या खून प्रकरणात पोलिसांनी रामचंद्र शिंदे (५३) याला ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्यातील दापोली वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांची एकाच वेळी हत्या झाली होती. तिहेरी हत्याकांडामध्ये सत्यवती पाटणे (75), पार्वती पाटणे ( 90) व इंदुबाई पाटणे (85) या तीन महिलांचा मुत्यू झाला होता. खून नेमका कशामुळे झाला याचा पोलिसांनी कसून तपास केला. घरातील दागिने गायब असल्याचे तपासादरम्यान आढळून आले. चोरीच्या उद्देशाने खून झाला असावा असा संशय पोलिसांना आला होता. त्यावरून तपासाची चक्रे फिरवली गेली असता पोलिसांच्या हाती धागेदोरे सापडले. यातूनच पोलिसांनी संशयित आरोपी रामचंद्र शिंदे याला ताब्यात घेतले आहे.