जानेवारीत साडेसातशे बंधाऱ्यांची उभारणी; शासनाच्या एक कोटींची बचत 

रत्नागिरी:- पाणीटंचाईसह घरगुती वापरासाठी आवश्यक पाण्यासाठी गावागावात श्रमदानातून बंधारे बांधण्याची मोहीम वेगाने राबवली जात आहे. अतिपावसामुळे यंदा जानेवारी महिन्यात साडेसातशे बंधारे बांधले आहे. लोकसहभागामुळे शासनाच्या एक कोटी रुपयांची बचत झाली असून लाखो लिटर पाणी बंधार्‍यात साचले आहे.

जिल्ह्यात यंदा 4002.77 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोकण हा अति पर्जन्यमानाचा प्रदेश असून देखील मोठयाप्रमाणात पाणी समुद्राला जाऊन मिळते. अनेकवेळा फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधण्याची संकल्पना पाच वर्षांपुर्वी हाती घेण्यात आली होती. त्या पाण्याचा वापर शेती व गुरांना पिण्याकरिता तसेच बोअरवेल, विहिरीची पाण्याची पातळी वाढविण्याकरिताही होतो. नदी, नाले, ओहोळ, छोटे ओहोळ यावर कच्चे, वनराई व विजय बंधारे बांधल्यास मोठयाप्रमाणात फायदा होऊन पाणी टंचाईच्या काळात दुर्भिक्ष टाळता येऊ शकते. गेल्या पाच वर्षात गावागावात असे बंधारे बांधण्यात येणार असून त्याचा फायदाही झाला आहे. अनेकवेळा बंधार्‍यात साठलेल्या पाण्यावर उन्हाळी शेतीही होते. काही ठिकाणी पिण्याचा पाण्याचाही प्रश्न सुटलेला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतक-यांना उन्हाळी पिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होऊ शकते.

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसहभागातून किमान 10 बंधारे बांधण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु यंदा अवकाळी पाऊस प्रत्येक महिन्यात पडत राहिल्यामुळे छोटे ओहोळ, नाले यांना मोठ्याप्रमाणात पाणी आहे. प्रवाहीत पाणी अडवणे अशक्य असल्याने बंधारे बांधण्याचा वेग कमी झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 754 बंधारे बांधण्यात आले आहेत. सर्वाधिक बंधारे चिपळूण तालुकयात बांधले गेले. त्यात 125 वनराई, 167 विजय आणि 462 कच्चे बंधारे आहेत. एक बंधारा बांधण्यासाठीचा खर्च आठ ते दहा हजार रुपये अपेक्षित असतो. त्यासाठी लागणार्‍या सिमेंट पोत्याच्या पिशव्याही गावातील देणगीदाराकडून किंवा ग्रामपंचायत उपलब्ध करुन देते. शासनाकडून तरतूद करावी लागत नाही. श्रमदानातून बांधलेल्या या बंधार्‍यामुळे एक कोटी रुपयांची बचत झाली आहे. बंधार्‍यात सध्या लाखो लिटर पाणी साठले गेले आहे. त्याचा उपयोग एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत होणार आहे.