चतुरस्र लेखिका स्मिता राजवाडे यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील सुप्रसिद्ध लेखिका स्मिता शरद राजवाडे (वय ७३) यांचे काल मंगळवारी रात्री ८ वाजता मंगळूर (कर्नाटक) येथे निधन झाले. कोकण मराठी कोशासह मराठी, हिंदी, उर्दूमध्ये विविधांगी लेखन, कविता, कादंबरी, ललित, लिखाण करणाऱ्या साहित्यिक म्हणून त्या राज्यभर प्रसिद्ध होत्या.

सुमारे 20-25 वर्षे रत्नागिरीमध्ये आपल्या लेखन शैलीने साहित्यप्रेमींना समृध्द लेखन देणार्‍या स्मिता राजवाडे ह्या मानवी जगण्याच्या दिशा देणार्‍या सिध्दहस्त लेखिका होत्या. नाटयलेखनापासून (संगीत स्वरपौर्णिमा) ते कादंबरी लेखनापर्यंतच्या लिहिण्यात त्यांनी स्वत:ची एक वेगळीच साहित्यिक प्रतिमा निर्माण केली. त्या कांदबरी, काव्य, कथा, ललित लेखन, नृत्यगान, समुहगान, बालसाहित्य अशा विविधांगी समाजभान असणारी साहित्यनिर्मिती त्यांनी केली. आकाशवाणीच्या त्या ‘ए’ ग्रेडच्या कलाकार होत्या. अखिल भारतीय आकाशवाणी पुरस्कार प्राप्त स्मिताताईंनी लेखन निर्मिती करतांनाच रत्नागिरीतील ‘जनसेवा ग्रंथालयाच्या’ जडणघडणीत स्वत:ला झोकून दिले होते.

त्यांना स्वाती, साक्षी आणि गौरी अशा तीन विवाहित कन्या आहेत. लेखिका स्मिता राजवाडे यांनी हिंदी आणि मराठी या दोन विषयांत प्रथम श्रेणीतून एमए पदवी संपादन केली. राष्ट्रभाषा पंडित,
साहित्य विशारद या परीक्षाही त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होता. स्वा. सावरकर, कुसुमाग्रज, संत कबीर यांच्यावर त्यांनी विपुल लेखन केले. रामचरितमानस या संपूर्ण काव्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. त्या उर्दू भाषाही शिकल्या. त्यातून त्यांनी उर्दू साहित्याचा अभ्यास केला. तसेच उर्दू काव्यरचनाही केल्या.  त्यांची 17 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कोकण मराठी कोशामध्ये त्यांनी लेखन केले आहे. स्त्री-जीवन, संतसाहित्यावरील लेखनाचा त्यात समावेश आहे. ‘गुण गुण गाणी’ या त्यांच्या बालसाहित्यसंग्रहाला पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा पुरस्कार मिळाला. शीघ्रकाव्य हेही त्यांच्या साहित्यप्रतिभेचे वैशिष्ट्य होते.
रत्नागिरी शहरातील अनेक कुटुंबांशी त्यांची जिव्हाळयाचे संबंध होते. अगदी घराघरात त्या कुटूंबप्रिय होत्या असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी समाजातील ऋणानुबंध सांभाळून ठेवले होते.

जिप्सी, नरपशू अशा कादंबर्‍या लिहितानाच ‘गवतफुल’ अशा आगळयावेगळया विषयावर ललित लेखन करतांना त्यांच्या साहित्य निर्मितीतील ‘उंची ’केवढी मोठी ते जाणवते. कोणत्याही पदापासून प्रसिध्दीपासून त्या दूर होत्या. पण त्यांचे लिखान समाजाला एक वेगळया अर्थाने प्रबोधनच होते.

कोकण मराठी साहित्य परिषदेशी त्यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. कोमसापच्या उपक्रमात त्या नेहमी सहभागी होत असत. झपुर्झा या कोमसापच्या त्रैमासिकात त्यांचे परीक्षण नेहमी छापून येत असे. कोमसापच्या रत्नागिरी शाखेच्या कामकाजात त्या आस्थेने सहभागी होत होत्या. साहित्य वर्तुळातील ज्येष्ठ साहित्यिका यांचे आज निधन झाले आहे. राजवाडे यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कोमसापतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.