आंबा पीक वाचवण्यासाठी बागायतदारांची मोठी धावपळ

रत्नागिरी:- थंडीमुळे तिसर्‍या टप्प्यात हापूसच्या बहूसंख्य झाडांना मोहोर आला आहे. झाडेच्या झाडे पानांपेक्षा मोहोरांनी झाकुन गेली आहेत; मात्र सोमवारी (ता. 17) दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने मोहोरावर किडींच्या प्रादुर्भावाची भिती आंबा बागायतदारांमध्ये आहे.

मागील आठ दिवसांमध्ये अवकाळी पाऊस, कडकडीत थंडी आणि ढगाळ वातावरण अशी स्थिती वारंवार पहायला मिळत आहे. मोहोर आणि कणी सेटींगच्या कालावधीत हापूसच्या कलमांना स्वच्छ वातावरण अपेक्षित असते. तसे झाले तर हंगामात चांगले उत्पादन मिळते; मात्र यंदा स्वच्छ वातावरणाचे दिवस कमी झाल्याचे चित्र वारंवार अनुभवयला मिळत आहे. तापमान नऊ अंशापर्यंत घसरल्यामुळे पौष महिन्यात अनेक हापूसच्या कलमांना मोहोर आला आहे. झाडांच्या 99 टक्के टाळयांना मोहोर फुटल्यामुळे पाने कमी मोहोर अधिक अशी स्थिती बहूसंख्य बागांमध्ये दिसत आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीला चांगली फुट झाली होती. बागायतदारांनी ऑक्टोबर महिन्यात फवारणी केल्यामुळे कणी सेटींगही चांगले होत होते. पण बदलत्या वातावरणाने कणी गळून गेली. फांदीला एखाद-दुसरी कैरी लगडलेली दिसत आहे. त्यानंतर जानवोरीच्या पहिल्या आठवड्यापासून पडलेल्या थंडीमुळे देठापासून मोहोर फुलले होते. पौष महिन्यात आलेल्या मोहोरला कणी सेटींग कमी होते. सध्याच्या स्थिती काय होते यावर बागायतदार लक्ष ठेवून आहेत; मात्र निसर्गाकडून साथ मिळत नाही. सोमवारी अचानक सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास सुर्यप्रकाश येऊ लागला. पण तोही अर्धा तासात गायब झाला. हलका वाराही वाहत होता. हे वातावरण आंबा पिकाला घातक असल्याचे बागायतदारांचे मत आहे. सकाळच्या सत्रात थंडीमुळे मोहोरावर दव पडतो. दिवसभर कडकडीत उन नसेल तर त्यात बुरशी पडण्याची शक्यता आहे. यावर बुरशीनाशकांची फवारणी अत्यावश्यक आहे. तसे न केल्यास मोहोरावर परिणाम होऊ शकतो.