आरे-वारेत पर्यटकांसाठी झीप-लाईन प्रकल्प 

रत्नागिरी:- ऐंशी ते शंभर फूट उंचावरून निळाशार समुद्र आणि खाडीवरून लहरत जाऊन मनमोहक निसर्गसौंदर्याचा विहंगम नजारा पाहण्याची नामी संधी आता पर्यटकांना झीप-लाईन या नव्या प्रकल्पामुळे मिळणार आहे. झीप-लाईनचा हा साहसी प्रकल्प तालुक्यातील आरे-वारे येथे रत्नदुर्ग माउंटेनिअरच्या काही सदस्यांनी खासगी तत्त्वावर उभारला आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून २६ जानेवारीला त्याचा लोकार्पण सोहळा होण्याची शक्यता आहे. पर्यटनवृद्धीच्यादृष्टीने टाकण्यात आलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
 

कोकणसह महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा त्यांनी केला आहे.आरे-वारे पूल सोडून पुढे गेल्यानंतर जो चढाव येतो तेथून ही झीप-लाईन टाकून ती सुरू बनापर्यंत आणली जाणार आहे. सुमारे १ हजार ४०० फूट लांबीची आणि ८० फूट उंचीची ही झीप-लाईन आहे. या लाईनवर बसण्यासाठी  सुरक्षित रॅक असणार आहे. तेथून पर्यटक लहरत निळाशार समुद्र, किनारा आणि खाडीचे सौंदर्य डोळ्यात साठवून आरे-वारे येथील सुरूबनात उतरणार आहे. कोकणात देवगडमध्ये वाळूवरील झीप-लाईन आहे; मात्र समुद्रकिनाऱ्यावरील कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प आहे.पर्यटकांना पर्यटनाचा वेगळा आनंद लुटता यावा यासाठी रत्नदुर्ग माउंटेनिअर्स या संस्थेच्या काही सदस्यांनी धाडसी पाऊल उचलले आहे. मंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी .एन. पाटील, सचिव रस्तोगी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आरे-वारे येथे झीप-लाईन हा साहसी आणि थरारक अनुभव देणारा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश चौगुले, जितेंद्र शिंदे, दिनेश जैन, अशी त्या व्यावसायिकांची नावे आहेत. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

 रत्नागिरीत मुक्कामासाठी
जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले असले तरी पर्यटनदृष्टीने अजून विकास झालेला नाही. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात येणारा पर्यटक देवदर्शन आणि समुद्रात डुंबण्याचा आनंद घेऊन लगेच परतीच्या प्रवासाला लागतो. पर्यटक रत्नागिरीत मुक्कामाला राहावा,असा पर्यटन विकास होण्याच्या दृष्टीने हे पाऊल आहे.

रत्नागिरीच्या पर्यटनवाढीसाठी अनेक दिवसांपासून हा प्रकल्प विचाराधीन होता. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाले आणि आरे-वारे येथे झीप-लाईनचा प्रकल्प उभा राहिला.
विरेंद्र वणजू, अध्यक्ष रत्नदुर्ग माउंटेनिअर्स